खाण संचालक सुरेश शानभाग यांच्याकडून परिपत्रक जारी : येत्या 15 ऑक्टोबरपासून हाताने परवाने देणे होणार बंद
प्रतिनिधी /पणजी
गौण खनिजमालाच्या वाहतुकीसाठी व इतर राज्यातून त्यांची आयात करण्यासाठी खाण संचालनालयाने ऑनालाईन परवाने देण्यास सुरुवात केली आहे. तशा आशयाचे परिपत्रक जारी करण्यात आले असून खाण खाते संचालक सुरेश शानभाग यांनी ते जिल्हाधिकारी व इतर संबंधित खात्यांना पाठवले आहे.
यापूर्वी 27 सप्टेंबर 2022 रोजी हाताने परवाने देण्याची पद्धत सुरु करण्यात आली होती. ती पद्धत 14 ऑक्टोबर 2022 पर्यंत चालू राहाणार आहे. त्यानंतर 15 ऑक्टोबरपासून हाताने परवाने देण्याचे बंद करण्यात येणार असून त्यानंतर फक्त ऑनलाईनच परवाने देण्यात येणार आहेत आणि तेच वैध ठरवले जाणार असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.
नियंत्रण कक्षाचा हेल्पलाईन नंबर
खाण खात्याचे निरीक्षक चेक पोस्टवर नेमण्यात आले असून ते खनिजमाल वाहतूक करणाऱया वाहनांकडे या परवान्याची, इतर कागपत्रांची तपासणी करतील आणि नंतरच त्या वाहनांना गोव्यात प्रवेश देण्यात येणार असल्याचे परिपत्रकात नमूद केले आहे. या वाहतुकीसाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचा हेल्पलाईन नंबर (8882254254 (एक्स्टेन्शन) 33) असा आहे.
वाहनाची खाण खात्याकडे नोंद हवा
गोव्यात खनिजमाल घेऊन येणारी वाहने खाण खात्याकडे नोंदणीकृत असावी. खाण खात्यामार्फत वेबसाईटवर त्या नोंदणीसाठी अर्ज उपलब्ध करण्यात आला असून तो ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. गौण खनिज वाहतुकीसाठी आवश्यक असलेले परवानेसुद्धा ऑनलाईन अर्ज करुनच मिळवायचे आहेत, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
खनिजमालाचा सविस्तर तपशील आवश्यक
आणलेला खनिजमाल कोठून आणला, त्या निर्यातदाराची माहिती (राज्य – जिल्हा – तालुका – गाव) पुरवावी लागणार असून किती टायर्सची किती वाहने गोव्यात येणार आहेत, याचा तपशील अर्जदाराने म्हणजे आयातदाराने देणे बंधनकारक आहे. खनिजमाल गोव्यात आयात करण्यापूर्वी त्याची सूचना 24 तास आधी खाण खात्याला देण्यात यावी, असे परिपत्रकातून कळविण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया अखंड 24 तास चालू राहाणार असून परवानेही तसेच ऑनलाईन उपलब्ध होणार असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.