कोरोना संसर्ग पसरत असल्याने नाकाबंदी
वार्ताहर / काकती
गौंडवाड-काकती संपर्क रस्ता बंद करण्यात आला आहे. काकतीत प्रवेश करणाऱयांना ‘नो एंट्री’ प्रवेश नाकाबंदी करण्यात आली आहे. गावात झपाटय़ाने कोरोना संसर्ग पसरत असून आता हद्दपार करण्यासाठी गाव एकवटले आहे.गौंडवाडहून काकतीला येणाऱयांना प्रवेशबंदी करण्यासाठी संपर्क रस्त्यात पेनच्या साहाय्याने झाड आडवे ठेवून रस्ता बंद करण्यात आला. सामाजिक नेते सिदाप्पण्णा गाडेकर, बाबुराव पिंगट, लक्ष्मण पाटील, भावकाण्णा टुमरी, जि. पं. सदस्य सिद्दगौडा सुणगार आदींच्या पुढाकारातून प्रवेशबंदी व जनजागृती करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना माजी एपीएमसी अध्यक्ष बाबुराव पिंगट म्हणाले, दोन लाख देशवासियांचे जीव घेणारा कोरोना झपाटय़ाने पसरतो आहे. बाधितांना दवाखान्यात बेड मिळणे कठीण झाले आहे. या महामारीचा उदेक भयावह असून काकतीतही बाधितांची संख्या वाढली आहे. यावर मात करण्यासाठी गावचा संपूर्ण सहभाग महत्त्वाचा आहे, असे पिंगट यांनी आवाहन केले आहे.
गावातील लोक गाफील राहिल्यानेच कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास मोठा अनर्थ घडेल, असे जि. पं. सदस्य सिद्दगौडा सुणगार, लक्ष्मण पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी युवावर्ग सामाजिक अंतर व मास्कचा वापर करून मोठय़ा संख्येने उपस्थित होता.









