अनगोळ येथील घटनेने सारेच अचंबित : सर्वत्र चर्चेचा विषय
प्रतिनिधी / बेळगाव
मैत्रीचे धागे कोळय़ाच्या जाळय़ापेक्षाही लहान असतात. पण लोखंडाच्या तारेहूनही मजबूत असतात. तुटले तर श्वासानेही तुटतील नाही तर वज्रघातानेही तुटणार नाहीत, अशीच अनेकांची मैत्री असते. केवळ माणसांतच नाही तर प्राण्यांमध्ये अशाचप्रकारे बऱयाचवेळा घट्ट मैत्री असते. त्याची उदाहरणे अनेकवेळा समोर येतात. अशाचप्रकारे अनगोळ येथे डुकर आणि माकडाची मैत्री झाल्याचे एक अनोखीच मैत्री समोर आल्याने हा एक चर्चेचा विषय बनला आहे.
गेल्या महिन्याभरापासून माकडाचे पिल्लू कळपातून बाहेर पडले आणि ते अनगोळ येथील कोनवाळ गल्ली भागात वावरत आहेत. माकडाचा एक कळप महिन्यापूर्वी आला होता. तो कळप या परिसरात वावरुन तो फिरुन गेला. मात्र त्या कळपातील एक पिल्लू येथेच राहिले. ते पिल्लू अनेकांनी दिलेली फळे किंवा इतर पदार्थ खात आहेत. काही इमारतींवर ठेवलेले जिन्नस ते खात आहेत. त्यामुळे अनेक जण त्या माकडासाठी काही तरी ठेवत आहेत.
येथे वावरत असताना त्याची मैत्री चक्क डुकराबरोबर झाली. त्याच्याशी बऱयाचवेळा ते खेळत-बागडत असते. तर चक्क त्याच्या पाठिवर असून फिरत असते.
डुक्कर फिरत असताना ते त्याच्या पाठिवर बसून काहीतरी खाण्यात दंग असते. डुकरांच्या पिल्लासोबतही त्याची चांगलीच मैत्री झाली आहे. कधी त्यांचे पाय ओढते तर कधी त्यांच्यावरच बसते. यामुळे हे माकडाचे पिल्लू त्यांचे चांगलेच मित्र बनले आहे. अशाप्रकारे एका माकडाच्या पिल्लाची डुकराबरोबर मैत्री झाल्याने सारे जणच अचंबित झाले आहेत.
एखादे कुत्रे त्या माकडाला पाठ लागले तर त्या कुत्र्यावर येथील डुक्कर धावून जात आहे. त्यामुळे त्यांची मैत्री ही कुतुहलाचीच बनली आहे. अनेक जण याचे चित्रीकरण करत आहेत तर काहीजण छायाचित्रेही घेत आहेत. सध्या यांची मैत्री घट्ट झाली आहे. मात्र यामुळे महिलांची डोकेदुखी वाढली आहे. कपडे धुवून घरावर वाळत घातले असताना त्यावर ते माकड खेळत आहे. केबलच्या वायर देखील तोडत आहे. असे असले तरी माकड आणि डुकराची ही मैत्री पाहून साऱयांनाच वेगळा अनुभव आणि आनंद अनुभवायला मिळत आहे. याची अनगोळ परिसरात जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.









