पन्नास साठ वर्षांपूर्वी स्वातंत्र्य नुकतेच मिळाले होते. खडतर स्थितीतून देश वाट काढत होता. दूध ही तशी दुर्मिळ चीज होती. सरकारी दूध केंद्रावर बाटलीबंद दर्जेदार दूध मिळत असे. पण ते मिळण्यासाठी रेशन कार्डासारखे एक कार्ड आवश्यक होते. ते कार्ड सहजी मिळत नसे. सणासुदीला साखर गायब होई. चीनच्या आक्रमणानंतर गहू मिळेनासा झाला. अमेरिकेने मेहरबानी म्हणून पाठवलेला लाल गहू अनेकांना पचत नव्हता. नंतर काही वर्षे भात दुर्मिळ झाला होता. देशाने त्यातून मार्ग काढला. धवल क्रांती, हरित क्रांती झाली आणि सगळय़ा गोष्टी मुबलक मिळू लागल्या. पण ऐंशीचे दशक ओलांडेपर्यंत स्वयंपाकाचा गॅस, टेलिफोन आणि दुचाकी या वस्तू देखील दुर्मिळ होत्या. पैसे भरून आणि किंवा बुकिंग करून अनेक दिवस, आठवडे, वर्षे वाट पहावी लागे. तेही दिवस गेले. पण या सर्व कालखंडात देवी, गोवर, कांजिण्या, पोलिओ वगैरे सर्वच रोगांच्या लशी विनामूल्य आणि प्रत्येकाला उपलब्ध होत्या. त्यासाठी बुकिंग वगैरेची भानगड नव्हती. देवीची लस शाळेतच टोचली जाई. ती घ्यायला मुले भ्यायची, लस टाळायला बघायची. पण लस टोचणारे अधिकारी आले की आमचे गुरुजन सहसा पीटीचे सर पळपुटय़ा मुलांना शिताफीने पकडून ठेवीत. लस टोचताना एक हात आरोग्यसेवकाच्या हातात घट्ट धरलेला असल्याने मुले उरलेला हात ओठांशी नेऊन शंखध्वनी करीत.
आज नेमके उलटे झाले आहे. सगळी धान्ये-तेले-साखर बऱयापैकी मुबलक आहेत. नव्या-जुन्या दुचाक्मया विकणारे डीलर्स, दुकानदार गल्लोगल्ली आहेत. ऑनलाईन पैसे भरले की हवा तसा फोन घरी येतो. केवायसी कागद दिले की सिमकार्ड मिळते. मोबाईलवर बुकिंग केले की गॅसचा सिलेंडर घरपोच येतो. पूर्वी एका पेठेत एखाद्या घरात फोन असे. आता घरोघरी माणशी किमान एक फोन असतो. फक्त ती शिंची लस सहजी मिळत नाही. कोणे एके काळी टेलीफोन, दुचाकी वगैरेसाठी, सणासुदीला साखरेसाठी जो छळ होई तो आता लशीसाठी होतो.
पण पूर्वी जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱयांना कोणी चांगले म्हणत नसे. कथा-कादंबरी असो की सिनेमा-नाटक… त्यात खूपदा खलनायक हा काळाबाजार करणारा रंगवला जाई. काळाबाजार करणाऱयालादेखील जगायचा अधिकार आहे असे म्हणायची कोणी हिंमत केली नव्हती. पण आता काय, विषाणूला देखील जगायचा अधिकार आहे असे पुढाऱयांना वाटू लागले आहे.
कालाय तस्मै नमः








