गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांची टीका, जनमत कौलदिन साजरा न केल्याबद्दल नाराजी
प्रतिनिधी / मडगाव
ज्या कौलामुळे गोव्याचे अस्तित्व वेगळे राहिले तो जनमत कौलाचा महत्त्वाचा दिवस सरकारी पातळीवर साजरा न करता म्हादई नदीचे पाणी वळविण्यास मान्यता देणारे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याबरोबर आंचिम साजरा करण्यात धन्यता मानणारे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपल्या या कृतीतून आपण गोवाविरोधी असल्याचे स्पष्ट केले आहे, अशी टीका गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली आहे.
54 व्या जनमत कौल दिनानिमित्त शनिवारी मडगावच्या लोहिया मैदानावर आयोजित केलेल्या सभेत बोलताना त्यांनी सरकारी धोरणांवर टीका केली. जनमत कौल हा गोव्याच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस असून हा दिवस सरकारी पातळीवर साजरा होण्याची गरज होती. मुख्यमंत्री सावंत यांनी या दिनाची दखलही न घेता कुठल्याही परिस्थितीत गोवा नष्ट करण्याचे आपले इरादे स्पष्ट केले आहेत, अशी टीका सरदेसाई यांनी केली.
दोन वर्षांआधी दोडामार्ग गोव्यात विलीन करा अशी मागणी झाली होती याची आठवण करून देताना सरदेसाई म्हणाले की, त्यांचा भूमिपुत्र गोव्याचा मुख्यमंत्री झाल्याने तेथील लोकांनी ही मागणी केली होती. गोव्याचे वेगळे अस्तित्व राखण्यासाठी 54 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात गोवा विलीन करण्याचे नाकारले होते. मात्र आता महाराष्ट्रातील भाग गोव्यात विलीन करून गोवेकरांना अल्पसंख्याक करण्याचे हे कारस्थान होते. मागच्या दोन वर्षांत म्हादईचा सौदा करून, कोळशासाठी रेल्वेमार्ग दुपदरीकरणाला चालना देऊन, गोवा मुक्तीदिनी मोले प्रकल्पाच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी आलेल्या युवकांना अटक करून, मेळावलीच्या लोकांचा आवाज दडपण्यासाठी बायका-मुलांवर पोलीस अत्याचार करून आणि स्वयंपूर्ण गोवाच्या नावाखाली गांजा लागवडीला उत्तेजन देण्याचा निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांनी आपले गोवाविरोधी धोरण स्पष्ट केले आहे, असा आरोप त्यांनी केला.
सर्वांनी एकत्र येऊन गोवा वाचवावा
सावंत हे लोकांनी निवडून दिलेले मुख्यमंत्री नसून दिल्लीवाल्यांनी बनविलेले मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे आपल्या दिल्लीच्या बॉसच्या तालावर ते नाचत आहेत. याच दिल्लीवाल्यांच्या आदेशावरून ते गोव्यातील पर्यटन व्यवसायासह गोव्यातील टॅक्सी व्यवसाय आणि अन्य व्यापार गोवेकरांच्या हातातून काढून घेऊन बाहेरच्या लोकांच्या हातात देऊ पाहत आहेत. असे हे सरकार पाडण्यासाठी आता सर्वांनी एकत्र येऊन गोवा वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे सरदेसाई पुढे म्हणाले.
गोवा वाचवून ठेवायचा असल्यास सर्वांनी स्वतःचा स्वार्थ विसरून आणि मतभेद बाजूला ठेवून टीम गोवा म्हणून पुढे यायला पाहिजे. 54 वर्षांपूर्वी डॉ. जॅक सिकेरा आणि अन्य नेत्यांनी गोवा वेगळा ठेवून गोव्याची सर्वधर्मसमभावता आणि संस्कृती वेगळी ठेवली. तो त्यांच्या स्वप्नातील गोवा शाबूत ठेवण्यासाठी आताच प्रयत्न सुरू करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
आवाज दडपण्यासाठी पोलिसांचा वापर
सध्या गोव्यातील आंदोलकांचा आवाज दडपण्यासाठी सरकार पोलिसांचा वापर करत आहे. यासाठी गोव्याबाहेरून आलेल्या आयपीएस अधिकाऱयांच्या वापर केला जातो. या अधिकाऱयांच्या आदेशावरून आमचे गोव्यातील पोलीसही लोकांना मारहाण करतात, असे सांगून सरदेसाई म्हणाले की, पोलिसांनी जरा सांभाळून राहावे. हे सरकार गेल्यावर हे दिल्लीचे पोलीस अधिकारीही जातील. पण येथे असलेल्या गोव्यातील पोलिसांना लोकांना जाब द्यावा लागेल याची जाणीव ठेवावी, असा इशारा त्यांनी दिला. सध्या रेल्वेमार्ग दुपदरीकरणाचे काम मार्गी लावण्यासाठी रेल विकास निगम पोलिसांना हाताशी धरून आंदोलकांवर गुन्हे दाखल करत आहे. ही दादागिरी चालू ठेवल्यास फातोर्डा मतदारसंघात असलेले निगमचे कार्यालय बंद करून टाकू, असा इशाराही त्यांनी दिला.









