प्रतिनिधी / पणजी
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (आंचिम) गोवा हे कायमस्वरुपी स्थळ म्हणून जाहीर झाल्यानंतर निर्माण झालेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या परिषदगृहाची (कन्व्हेन्शन सेंटर) गरज आता सत्यात येण्याच्या प्रक्रियेत पोहोचली आहे. त्यासाठी तब्बल 700 कोटींचा महाप्रकल्प उभारण्यात येणार असून त्यात हॉटेल, मॉल, मल्टिप्लेक्सपर्यंतच्या सर्व सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. खर्चाचा विचार करता वर्षभरापूर्वीच उद्घाटन करण्यात आलेल्या अटल सेतूच्या तोडीचा हा प्रकल्प असेल.
निविदाधारक कंपनीच करणार संपूर्ण खर्च
दोनापावल येथील 98,299 चौ. मी. भूमीवर साकारण्यात येणारे हे परिषदगृह तब्बल 5 हजार आसनक्षमतेचे असणार आहे. या प्रकल्पाची प्रक्रिया आता मार्गी लागली असून सरकारने त्यासाठी इच्छुक कंपन्यांकडून प्रस्ताव मागविले आहेत. येत्या 11 फेब्रुवारीपर्यंत हे प्रस्ताव पाठविता येणार आहेत. त्यानुसार प्रकल्पाचा आराखडा धरून त्याच्या पुर्णत्वापर्यंतचे सर्व काम संबंधित कंपनीलाच स्वखर्चाने करावे लागणार आहे.
त्यानंतर पुढील 60 वर्षांसाठी हे परिषदगृह प्रवर्तक कंपनीच्या ताब्यात राहणार आहे.
आंचिमचे सर्व कार्यक्रम येणार एकाच छताखाली
हे कन्व्हेंशन सेंटर पूर्ण झाल्यानंतर आंचिमचे सर्व कार्यक्रम एकाच छताखाली येणार आहेत. त्याशिवाय गोवा हे जागतिक पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असल्याने मोठय़ा कॉर्पोरेट कंपन्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय परिषदा भरविण्यासाठी गोव्याची निवड करतात. या कंपन्यांसाठी कन्व्हेंन सेंटर सुंदर स्थळ ठरणार आहे.
हॉटेल, मल्टिप्लेक्स थिएटर, शॉपिंग मॉलचाही समावेश
या सेंटरमध्ये तब्बल 500 खोल्यांचे हॉटेल असेल. त्याशिवाय प्रदर्शन हॉल, परिषद सभागृह, 4 क्रिनचे मल्टिप्लेक्स थिएटर, शॉपिंग मॉल यासारख्या सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.
सौर उर्जा व्यवस्थेसह स्वतःचेच कचरा व्यवस्थापन
चित्रपटांसाठी शुटिंग व्यवस्थाही या सेंटरमध्ये असेल. त्याशिवाय गोवा मनोरंजन संस्था, स्मार्टसिटी व अन्य कार्यालयेही असणार आहेत. सेंटरसाठी लागणारी वीज निर्मिती स्वतःच करण्याची सौर उर्जा व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन आणि पार्किंगची सोय या प्रकल्पाच्या परिसरात करण्यात येणार आहे.









