प्रतिनिधी / पणजी
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ाचे ‘तौकाटे’ चक्रिवादळात रुपांतर झाले असून ते केरळपासून दूर आहे. ते गुजरातच्या दिशेने सरकत आहे. दि. 16 रोजी चक्रिवादळामुळे सर्वत्र जोरदार वादळीवारे व गोव्यात सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
गुरुवारी राज्यातील काही भागात दुपारनंतर मध्यम प्रमाणात पाऊस झाला. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज दि. 14 रोजी राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडेल. तौकाटे’ हे चक्रिवादळ दि. 16 रोजी प्रत्यक्ष सक्रिय होईल. ते गोव्यापासून दूरवर समुद्रातून गुजरातकडे सरकणार आहे. या दरम्यान दि. 14 रोजी केरळ, कर्नाटक व गोव्यात जोरदार पाऊस पडेल. दि. 15 मे रोजी गोव्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडेल. दि. 16 रोजी विजांच्या गडगडाटाबरोबरच जोरदार वादळीवाऱयासह मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे. निर्माण होत असलेले ‘तौकाटे’ चक्रिवादळ दि. 19 रोजी गुजरात व पाकिस्तानला जाऊन आदळेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
सर्वांनाच सावधानतेचा इशारा
या मुसळधार पावसामुळे गोव्यातही काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता गृहित धरून हवामान खात्याने सर्वांनाच सावधानतेचा इशारा दिलेला आहे. गोव्याच्या समुद्रकिनारी राहणाऱयांनी याची दक्षता घेतली पाहिजे. आजपासून मच्छिमारांनी खोल समुद्रात जाणे टाळावे. कारण समुद्र प्रचंड खवळलेला आहे. लाटांची उंचीही वाटत आहे. गोव्यात पाच दिवस पावसाचा मुक्काम असेल. दि. 17 रोजी देखील गोव्यात सर्वत्र मध्यम तथा काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
वाऱयाचा वेग ताशी 40 ते 70 कि.मी. पर्यंत
मुसळधार पावसाबरोबरच वादळी वाऱयाचा वेग हा ताशी 40 कि. मी. वरून 70 कि. मी. पर्यंत वाढण्याची भीती हवामान खात्याने विशेष पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे. गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या किनारी भागानांही हवामान खात्याने सावधानतेचा इशारा आजपासून दिला आहे.
उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन
तौकाटे चक्रिवादळ आणि वादळी पावसाची शक्यता गृहीत धरुन गोव्यातील सर्व लोकांनी साधगिरी बाळगावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी केले आहे.








