राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून उघड
प्रतिनिधी/ पणजी
मद्यपान हे पूर्वीपासूनच काही समाजापुरते मर्यादित होते. परंतु आताच्या आधुनिक जीवनशैलीमुळे आणि स्पर्धात्मक जीवनामुळे गोव्यात पुरूषांबरोबर महिलांही मद्यपानाकडे वळल्या जात असून आरोग्य मंत्रालयाकडून नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार गोव्यात मद्यपान करणाऱयांची संख्या वाढत असून त्यात मद्यपान करणाऱया महिलांची टक्केवारी जास्त प्रमाणात आढळून आली आहे.
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 2015-16 हे फक्त 15-49 या वयोमर्यादेतील मद्यपान करणाऱया पुरूष व महिलांवर आधारित होते. परंतु यंदाचे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 2019-2020 हे 15 वर्षावरील व्यक्तींवर करण्यात आले आहे. गोव्यात 15 वर्षे व त्यावरील वयोगटातील मद्यपान करणाऱयांमध्ये महिलांची एकूण टक्केवारी 5.5 टक्के आहेत ज्यात शहरी भागात 5.6 टक्के तर ग्रामीण भागात 5.3 टक्के आहे. तसेच पुरूषांची एकूण टक्केवारी 36.9 असून यात शहरी भागात 38.2 टक्के तर ग्रामीण भागात 34.9 टक्के आहे.
तसेच उत्तर गोव्यात 4.4 टक्के महिला तर 33.8टक्के पुरूषांची संख्या आहे. आणि दक्षिण गोव्यात मद्यपान करणाऱयांची संख्या अधिक असून यात महिलांची संख्या जास्त आहे. दक्षिण गोव्यात 15 वर्षे व वरील वयोगटातील महिलांचे प्रमाण 7 टक्के असून पुरूषांची टक्केवारी 41.1 टक्के असल्याची माहिती सर्वेक्षणातून उघड झाली आहे. आधुनिक जीवनशैली तसेच तणाव घालविण्यासाठी मद्यपानाचा पर्याय निवडत असल्याचे दिसून येत आहे.









