कोल्हापूर/प्रतिनिधी
गोव्यात भाजप 22 पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा विश्वास गोव्याचे उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर यांनी व्यक्त करत सुदिन ढवळीकर यांच्यावर निशाणा साधला. गोव्यात आम्ही बहुमतात येत असून ढवळीकर यांची आम्हाला गरज लागणार नाही. असा टोला आजगावकर यांनी लगावला. ते करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापुरात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
गोवा राज्याचे उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर आज कुटुंबियासमवेत कोल्हापुरात आले होते. त्यांनी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास श्री करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी राहिला आहे. देवीच्या आशीर्वादाने मी चार वेळा आमदार आणि आता उपमुख्यमंत्री बनलो आहे. देवीच्या आशीर्वादानेच मी पुन्हा एकदा निवडून येणार आहे. तसेच गोव्यामध्ये 22 पेक्षा अधिक जागांवर भाजप निवडून येईल, असा विश्वास आजगावकर यांनी व्यक्त केला.
खासदार संजय राऊत यांनी भाजपने गोव्यात देखील फोन टॅपिंग चे प्रकार केले, असल्याचा आरोप केला होता. त्यावर बोलताना आजगावकर यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. निवडणूक म्हटलं की राजकारण आणि आरोप-प्रत्यारोप होणारच, ज्यांच्याकडे खोट नाही त्यांना घाबरण्याची गरज काय? आम्ही कोणावर डाव धरायचा, हल्ला करायचा असा विचार सुद्धा करत नाही. असे म्हणत त्यांनी एक प्रकारे खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सरकार मध्ये आम्ही कधीच जाणार नाही. असे मगोचे सुदिन ढवळीकर यांनी म्हटले आहे. त्यावर बोलताना आजगावकर यांनी गोव्यात भाजप 22 पेक्षा अधिक जागांवर निवडून येणार असून बहुमतात आम्ही असणार आहे. त्यामुळे सुदिन ढवळीकर यांची गरज नाही. अशा शब्दात आजगावकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.









