मडगांव : पुढील महिन्यात गोव्यामध्ये होणाऱया इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विविध फुटबॉल संघांतील फुटबॉलपटूंच्या आगमनाला प्रारंभ झाला आहे. गोव्यातील तीन ठिकाणी या स्पर्धेतील सामने खेळविले जाणार आहेत. सदर स्पर्धेमध्ये 11 संघांचा सहभाग राहील.
2020 च्या आयएसएल फुटबॉल हंगामाला नोव्हेंबर महिन्यात प्रारंभ केला जाणार असून देशातील सध्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेत कोरोना संदर्भातील नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. सदर स्पर्धेतील सामने बंदीस्त स्टेडियममध्ये प्रेक्षकविना गोव्यातील तीन फुटबॉल स्टेडियमवर खेळविले जाणार आहेत. मडगांवमधील जवाहरलाल नेहरू स्टेडियम, बांबोळीतील जीएमसी ऍथलेटिक स्टेडियम आणि वास्कोतील टिळक मैदान स्टेडियमवर या स्पर्धेतील सामने घेतले जाणार आहेत.
या स्पर्धेत सहभागी होणारे एफसी गोवा, एफसी हैद्राबाद आणि एफसी केरळ ब्लास्टर या संघांनी आपल्या प्रशिक्षण सरावाला यापूर्वी प्रारंभ केला आहे. बेंगळूर एफसी संघाने बेल्लारीतील आपल्या अकादमीच्या मैदानावर चालू माहिन्यात सरावाला सुरूवात केली आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱया उर्वरित संघांच्या सरावाला आठवडाअखेरीस प्रारंभ होणार आहे. फुटबॉलपटूंचा निर्धारित क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना सरावाला परवानगी दिली जाईल, असे स्पर्धा आयोजकांनी सांगितले.
चेन्नयीन एफसी आणि या संघाच्या प्रशिक्षक वर्गानी गोव्यातील आपल्या आगमनाची तारीख अद्याप घोषित केलेली नाही.
2020 च्या इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत पहिल्यांदा सहभागी होणारा एफसी इस्ट बंगाल संघ 16 ऑक्टोबरला गोव्यात दाखल होणार आहे. एफसी जमशेदपूर संघातील विदेशी खेळाडूं पीटर हार्टले आणि व्हॅलेसकिज यांचे गेल्या शुक्रवारी गोव्यात आगमन झाले आहे. त्याचप्रमाणे नॉर्थ इस्ट युनायटेड संघातील उरूग्वेचा फुटबॉलपटू गॅलेगो गोव्यात नुकताच दाखल झाला आहे. मुंबई सिटी एफसी संघाचे स्पॅनीश प्रक्षिशक लोबेरा आणि हैद्राबाद एफसी संघाचे विदेशी प्रशिक्षक मार्क्वेझ यांचे मंगळवारपर्यंत गोव्यात आगमन होणार आहे.