मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची पत्रकार परिषदेत माहिती
प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत आणखी एका रुग्णाची भर पडली असून एकूण संख्या सातवर पोहोचली आहे. नवा रुग्ण हाही विदेशातूनच आला होता. या सर्व रुग्णांपैकी सहाजण विदेशातून आले होते तर एकजण कौटुंबिक संसर्गातून बाधित झालेला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. तबलिगी संबंधित नवीन कुणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
आल्तिनो येथील सरकारी निवासस्थानी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात प्रारंभापासूनच घेतलेल्या खबरदारीमुळे रुग्णांची संख्या नियंत्रणात राखण्यात आम्हाला यश आले असून गोवा अद्याप प्राथमिक टप्प्यातच आहे. सामाजिक अंतर राखणे, प्रमुख परिसरांचे निर्जंतुकीकरण करणे, स्वच्छता पाळणे यासारख्या उपाययोजना कायम सुरूच ठेवण्यात आल्यामुळे हे शक्य झाले आहे. राज्यात विविध ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या कामगार संगोपन केंद्रावर योग्य ती स्वच्छता पाळून त्यांना अन्न देण्यात येत आहे. गोव्याप्रमाणे अन्य कुठेच अशा प्रकारची सुस्वच्छ केंद्रे स्थापन करण्यात आली नसावीत, असे मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले.
दिल्लीतील निजामुद्दीन येथून गोव्यात आलेल्या तबलिगींचे प्रयोगशाळेत पाठविलेले नमुने अहवाल नकारात्मक आले आहेत. एकूण 46 तबलीगी गोव्यात आले होते. त्यांना विविध विभागात ठेवण्यात आले होते. काल 25 जणांचे अहवाल पाठविले होते त्यातील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर व्यक्ती आफ्रिकन देशातून आली आहे. तिला मडगाव येथील कोविड 19 इस्पितळात दाखल केले आहे. गोव्यात सापडलेल्या कोरोना बाधित सात रुग्णांपैकी एक जो स्थानिक आहे तो त्यांच्यातीलच एकाचा भाऊ आहे. त्यामुळे तो कौटुंबिक संसर्गाचा बाधित आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
एखाद्या व्यक्तीस स्वतःबद्दल संशय असल्यास त्याने त्वरित तपासणी करून घ्यावी. त्याचबरोबर हात स्वच्छ धुणे, तोंड झाकणे यांचेही काटेकोर पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
स्थानिक चिकनवर बंदी नाही
राज्यात लोकांना चिकन खाण्यास बंदी घालण्यात आल्याचे जे वृत्त पसरले आहे ते चुकीचे आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार आम्ही केवळ अन्य राज्यातून येणारे चिकन बंद केलेले आहे. त्यामागे गोमंतकीयांचे हित जपणे हा एकच हेतू आहे. गोव्यातील स्थानिक चिकन हे पूर्ण शुद्ध आणि सुरक्षित असून ते कुणीही खाऊ शकतो. या विषयावर कुणीही राजकारण करू नये. अन्य राज्यातील चिकन संदर्भात पशुसंवर्धन खात्याकडून ना हरकत प्राप्त झाल्यानंतर दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
कोणत्याही कामगारावर अन्याय झाल्यास कारवाई
राज्यात लॉकडाऊनच्या काळात सर्व बाजारपेठा, औद्योगिक आस्थापने, कंपन्या बंद ठेवण्यात आल्या असल्या तरी कोणताही दुकानमालक किंवा कंपनीने कर्मचाऱयांच्या पगारात कोणतीही कपात न करता त्यांना पूर्ण पगार द्यावा, आणि तो ठरलेल्या तारखेतच द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. एवढे असूनही कोणत्याही ठिकाणी कोणत्याही प्रकारे कामगारांवर अन्याय होत असल्याचे दिसून आल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.
राज्यात घरे भाडय़ाने दिलेल्या लोकांनी आपल्या भाडेकरूंना एका महिन्याचे भाडे माफ करावे, अशी विनंती सरकारतर्फे करण्यात आली आहे. एखादा घरमालक, जमीनदार आपला भाडेकरू, यात खास करून विद्यार्थी भाडेकरूंकडे भाडे मागत असेल, घर खाली करण्यासाठी दबाव आणत असेल किंवा त्यांना हाकलून लावण्याचा प्रयत्न करत असेल तर आपत्कालीन व्यवस्थापन कायद्याखाली त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जमीनदार, घरमालकांनी या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, अशी आपली कळकळीची विनंती आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
राज्याच्या सर्व सीमा सील करण्यात आलेल्या आहेत. गोव्याच्या हितासाठी सर्वांनी 14 मार्चपर्यंत लॉकडाऊन कटाक्षाने पाळावा. काही राज्यात कौटुंबिक संसर्गबाधा झालेली आहे. गोव्यात अद्याप तो प्रकार झालेला नाही, आणि यापुढे तसा प्रकार होऊ नये यासाठी कोरोना महामारीच्या युद्धात सर्वांनी एकसंध राहावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
उसगाव येथील दोन औद्योगिक प्रकल्पांना चालू करण्यास मान्यता दिल्यासंबंधी विचारले असता, सदर दोन्ही प्रकल्प हे खाद्यान्न उत्पादक असून तेथे आरोग्यविषयक पूर्ण स्वच्छता व शुद्धता पाळण्यात येत असल्याने ते चालू करण्यास हरकत नसावी, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच वेर्णा औद्योगिक वसाहतीत एका प्रकल्पातून कर्मचाऱयांना डच्चू देण्याचा प्रयत्न चालल्याबद्दल विचारले असता तेथील राज्य कामगार आयुक्तांची भेट घ्यावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सायबर क्राईम विभाग अधिक सक्रीय
कोरोनासंबंधी खोटय़ा, बनावट, गैरसमज पसरविणाऱया बातम्या, फोटो समाजमाध्यमांवरून प्रसारित, प्रसिद्ध केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असून तसे आदेश आपण राज्य पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाला दिले आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद द्या : मुख्यमंत्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानुसार आज रविवार दि. 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी प्रत्येकाने आपल्या घरातील बल्ब, टय़ुबलाईट आदी उजेडाची साधने बंद करावीत. त्या काळात मेणबत्ती, पणती, टॉर्च किंवा मोबाईलची फ्लॅशलाईट पेटवावी असे म्हटले आहे. गोवा राज्य त्यांच्या या आवाहनाला पूर्ण पाठिंबा देणार असून सर्व गोमंतकीयांनी त्यानुसार कृती करावी, असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले.
कोरोना महामारीच्या या युद्धात 130 कोटी देशवासीय माननीय पंतप्रधानांच्या मागे आहे, हे दाखविण्यासाठी हा प्रयत्न आहे. त्या काळात सर्वत्र काळोख करा याचा अर्थ पूर्ण वीजव्यवस्थाच बंद करावी असा होत नाही. घरातील केवळ उजेडाची साधने बंद करावी, इलेक्ट्रीकल किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणे जैसे थे चालू ठेवावीत. स्ट्रीट लाईटस् तसेच अन्य अत्यावश्यक ठिकाणच्या लाईटस् चालू राहतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.









