मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेली माहिती, आमोणे-पैंगीण येथील आश्रमशाळेचे लोकार्पण, गोव्यातील अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प
प्रतिनिधी /काणकोण
आमोणे, पैंगीण येथील आश्रमशाळा हा गोव्यातील अशा प्रकारचा पहिला प्रकल्प असून आदिवासी समाजाकडे असलेल्या लोकसंस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी गोव्यात लवकरच आदिवासी संग्रहालय आणि आदिवासी संशोधन केंद्र उघडण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. संस्कृतीमय शिक्षण हा स्ंाकल्प पुढे घेऊन जाताना गुणात्मक व दर्जेदार शिक्षण देणाऱया शाळांपैकी आमोणे येथील बलराम शिक्षणसंस्था ही एक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
आमोणे, पैंगीण येथील म्हशीफोंड या ठिकाणी उभारलेल्या आश्रमशाळेचा गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते लेकार्पण सोहळा शुक्रवारी झाला. या सोहळय़ाला मुख्यमंत्री सावंत, अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष व माजी मंत्री रमेश तवडकर, आदिवासी कल्याण खात्याचे सचिव रवी धवन, खात्याच्या संचालिका त्रिवेणी वेळीप, पैंगीण जिल्हा पंचायत सदस्या शोभना वेळीप, पैंगीणचे सरपंच जगदीश गावकर आणि हिमाचल प्रदेशच्या जनमोर्चाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आदिवासी कल्याण मंत्रालय आणि जनजाती मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य प्रकल्प साकारण्यात आला असून त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने मिळून 35 कोटी रु. इतका खर्च केला आहे. आमोणे येथील तवडकर कुटुंबाने त्यासाठी 30 हजार चौ. मी. इतकी जमीन दिली आहे. या आश्रमशाळेत 300 मुलगे आणि 200 मुलींची सोय करण्यात येणार असून अद्ययावत वर्गखोल्या, संगणक कक्ष, प्रयोगशाळा, संगीत कक्ष आणि क्रीडाकक्षासाठी स्वतंत्र खोल्या, 500 विद्यार्थी बसू शकतील एवढा भोजन कक्ष, मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहे तसेच शिक्षक कर्मचाऱयांसाठी स्वतंत्र वसतिगृह आणि लिफ्टची सोय या ठिकाणी करण्यात आली आहे. संपूर्ण गोव्यातील अशा प्रकारची ही पहिली आश्रमशाळा आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
शाळांना साधनसुविधा पुरवितानाच विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली यंत्रणा देण्याकडे आपल्या सरकारचा कल आहे. आपल्या अडीच वर्षांच्या कालावधीत कोरोनामुळे दीड वर्ष वाया गेले नपेक्षा गोव्याचा सर्वांगीण विकास झालेला पाहायला मिळाला असता, असे मुख्यमंत्री सावंत पुढे म्हणाले. स्वयंपूर्ण गोवा आणि आत्मनिर्भर भारतबरोबर नवभारत निर्मितीचा नारा त्यांनी यावेळी दिला.
आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांबरोबरच आदिवासी समाजातील मुलांमुलींना वरच्या स्तरावर आणण्यासाठी राज्य तसेच केंद्र सरकार अनेक योजना राबवत असून आमोणे येथील आश्रमशाळा हा त्यातलाच एक प्रकल्प असल्याचे मत राज्यपाल पिल्लई यांनी व्यक्त केले. सदर प्रकल्पात वैद्यकीय केंद्र सुरू करण्यासाठी राज्यपालांनी यावेळी 5 लाख रुपयांच्या निधीची घोषणा केली. दुर्बल लोकांचा विकास झाल्याशिवाय समस्त गोव्याचा विकास पूर्ण होऊ शकत नसल्याचे सांगून हा प्रकल्प उभारण्यासाठी धडपडलेल्या सर्वांचे राज्यपालांनी मुक्तकंठाने कौतुक केले.
आश्रम शाळेची स्वप्नपूर्ती
आदिवासी समाजातील लोकांच्या समस्या लक्षात घेऊन त्या सोडविण्याचा विडा उचलूनच आदर्श युवा संघाची स्थापना करण्यात आली होती. शिक्षणाचा प्रसार, ग्रामीण संस्कृतीचे जतन, रोजगारनिर्मिती व कृषी संवर्धन हे विषय घेऊन पुढे आलेल्या येथील युवकांचे आश्रमशाळेचे स्वप्न पूर्ण झाले आहे, असे उद्गार रमेश तवडकर यांनी यावेळी कृमतज्ञतापूर्वक काढले.
प्रकल्पासाठी जमीन दिलेल्या भूमिपुत्रांचा गौरव
आमोणे, म्हशीफोंड येथील आश्रमशाळेसाठी जी जमीन वापरण्यात आलेली आहे ती सगळी जमीन तवडकर कुटुंबियांची असून यावेळी राज्यपाल पिल्लई यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन परशुराम तवडकर, सुरेश गावकर, चंद्रकांत तवडकर, बाबू जानू तवडकर, मोहन तवडकर आणि बोंबो तवडकर यांचा प्रातिनिधीक स्वरूपात गौरव करण्यात आला. बलराम निवासी शाळेच्या शिक्षक कर्मचाऱयांनी सादर केलेल्या स्वागत गीतानंतर आदिवासी कल्याण खात्याच्या संचालिका वेळीप यांनी स्वागत केले. आदिवासी कल्याण खात्याचे सचिव धवन यांनी पाहुण्यांना स्मृतिचिन्हे प्रदान केली. सूत्रसंचालन योगिनी आचार्य यांनी केले, तर नीरा नाईक यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री गोविंद गावडे, उपसभापती इजिदोर फर्नांडिस अनुपस्थित होते, तर भाजपाचे संघटनमंत्री सतीश धोंड आणि काणकोण भाजप मंडळातील प्रमुख कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









