वार्ताहर/ माशेल
कोविड-19 च्या लॉकडाऊन काळात अडकलेल्या मजूरांच्या करूणकथा दिवसेंदिवस समोर येत आहेत. गोव्यात उदारनिर्वाहासाठी राहत असलेल्या मूळ खानापूर येथील अशाच एका मजूराच्या गरोदर पत्नीवर संकट आले होते. मात्र सर्वांनी तिच्याकडे सहानुभूतीने पाहून तिला सुखरूपपणे गोवा बॉर्डर पार करुन कर्नाटकात पोहोचविण्यात आले.
जयेश नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर महिला आठ महिन्यांची गरोदर आहे. तिचे नाव धनश्री परशुराम फटाण असे आहे. आपल्या पती व दोन मुलांसह तिवरे येथे भाडय़ाच्या घरात ती राहत आहे. लॉकडाऊनपुर्वी काही कामानिमित्त तिचा पती खानापूर गेला असता तिथेच अडकला. त्यामुळे लहान मुलांसह गोव्यात असलेल्या धनश्रीवर बाका प्रसंग ओढवला होता. शेजाऱयांनी तिला धीर देण्याचा प्रयत्न केला.
तिने स्थानिक पंचसदस्य जयेश नाईक यांना आपली करूण कहाणी ऐकविली होती. तसेच बाळंतपणी आपल्या दोन लहान मुलांच्या काळजीही व्यक्त केली होती. जयेश यांनी सदर बाब मंत्री गोविंद गावडे यांच्या कानावर घातल्यानंतर त्वरित उपाययोजना व त्यासंबंधी कागदोपत्री व्यवहार पूर्ण करून वाहनाची व्यवस्था करण्यात आली. तिला सुखरूप खानापूर येथे पोचविण्यात आले आहे.