तपासणी नाक्यावरच रोखणार : मोफत टेस्टची सुविधा : तहसीलदार खानोलकर यांची माहिती
एकदा टेस्ट केल्यावर दहा दिवस दिवस जाता येणार
नव्याने आयी, सासोली येथे चेकपोस्ट उभारणार
प्रतिनिधी / दोडामार्ग:
दोडामार्ग तालुक्यातून गोव्यात कामानिमित्त गोव्यात ये-जा करणाऱयांचे प्रमाण अधिक आहे. आताच्या लॉकडाऊनमध्ये गोव्यात ये-जा करणाऱयांना मुभा होती. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता गोव्यात ये-जा करण्यासाठी फक्त दोन दिवस मुभा मिळणार आहे. तशा सूचना सोमवारी सायंकाळपासून चेकपोस्टवर देण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांनंतर कामानिमित्त गोव्यात ये-जा करायचे असल्यास आरटीपीसीआर टेस्ट सक्तीची करण्यात आली आहे. एकदा टेस्ट केल्यावर पुढील दहा दिवस येण्याजाण्यासाठी मुभा मिळणार आहे, अशी माहिती दोडामार्ग तहसीलदार अरुण खानोलकर यांनी दिली.
आरटीपीसीआर टेस्टची सुविधा दोडामार्गात असून ती मोफत आहे. शिवाय दोडामार्गसह उद्यापासून नव्याने आयी आणि सासोली या ठिकाणी नव्याने चेकपोस्ट नाके उभारले जाणार आहेत. त्यामुळे सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे. आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी सुलभ सुविधा मिळेल. कोणाचीही गैरसोय होणार नसल्याचेही खानोलकर यांनी सांगितले. पेट्रोलसाठीच्या मुभाबाबत वरिष्ठांशी बोलून निर्णय घेतला जाईल, असेही तहसीलदार खानोलकर म्हणाले.








