कोरोना प्रतिबंधक लसीकरण अथवा चाचणी आवश्यक
वार्ताहर / खानापूर
जिल्हाधिकाऱयांनी खानापूर तालुक्यातील पर्यटन स्थळांवर सुट्टीच्या दिवशी पर्यटकांना बंदीचे आदेश बजावले आहेत. शिवाय जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानुसार कर्नाटकाच्या सीमेवर चोर्ला भागातून येणाऱया गोव्यातील पर्यटकांनाही आता तपासणी करूनच कर्नाटकात प्रवेश दिला जाणार आहे. गोवा आणि महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून खानापूर तालुक्मयातील चोर्ला राज्यमार्गावरील कणकुंबीत चेकपोस्टची उभारणी करण्यात आली आहे.
चोर्लामार्गे कर्नाटकात प्रवेश करणाऱया सर्व प्रवाशांची तपासणी केली जाणार आहे. आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल अथवा कोरोना लसीकरण झाल्याचा दाखला दाखविणाऱयांनाच प्रवेश दिला जाणार आहे. गेल्या आठ दिवसांपासून तालुक्मयात कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. संसर्गापासून पूर्णपणे सुरक्षित असलेल्या तालुक्मयाला तिसऱया लाटेचा कोणताही धोका उद्भवू नये यासाठी जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार कणकुंबी येथे परराज्यातून येणाऱया प्रवाशांवर नजर ठेवण्यासाठी 24 तास कार्यरत चेकपोस्ट उभारणी करण्यात आली आहे. कर्नाटकात प्रवेशासाठी 48 तासांच्या आतील कोरोना निगेटिव्ह अहवाल सादर करणे आवश्यक आहे.
आशा कार्यकर्त्यांकडून थर्मल स्क्रिनिंग केले जात आहे. अहवाल तपासणीसाठी महसूल विभागाचे तलाठी कार्यरत आहेत. गुरुवारी पोलीस निरीक्षक सुरेश शिंगी यांनी कणकुंबीतील चेक पोस्टला भेट देऊन पाहणी केली.
पावसातही प्रवाशांची सक्तीने तपासणी
गोव्यातून अनेक पर्यटक चोर्ला अथवा अनमोड मार्गे कर्नाटकात येतात. त्यामुळे या मार्गावरील कणकुंबी येथे चेकपोस्ट उभारला आहे. याची जबाबदारी खानापूर पोलिसांना देण्यात आली आहे. पावसातही चेकपोस्टवरील कर्मचाऱयांना प्रत्येक प्रवाशांची कसून तपासणी करावी लागत आहे. आता गोव्यातून कर्नाटकात येणाऱया प्रवाशांची सक्तीने तपासणी केली जाणार असून या ठिकाणी कर्मचारी सेवा बजावत आहेत. बस, चारचाकी व दुचाकी या सर्व वाहनातून येणाऱया प्रवाशांना कर्नाटकात प्रवेश करण्यापूर्वी तपासणी व चौकशीला सामोरे जावे लागत आहे.









