दोडामार्ग पोलिसांची सासोली येथे कारवाई
वार्ताहर / दोडामार्ग:
जिल्हाधिकाऱयांच्या कोरोना विषाणू प्रतिबंधक आदेशाची अवज्ञा व वन्यप्राण्यांच्या अवैध शिकारीच्या उद्देशाने विनापरवाना बंदूक बाळगल्याप्रकरणी गोव्यातील सहा जणांना दोडामार्ग पोलिसांनी मंगळवारी अटक केली. सासोली येथे ही कारवाई करण्यात आली. संशयितांकडून बंदूक जप्त करण्यात आली.
नीलेश सदानंद वेर्णेकर (32 ), आयवन कार्म कुलासो (42), जॉनी मिली कुलासो (32, तिघेही रा. राया, मडगाव, दक्षिण गोवा) तसेच विशाल, सनी (दोघेही रा. मडगाव, दक्षिण गोवा) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. सासोली तिठा येथे ही कारवाई बुधवारी पहाटेच्या सुमरास करण्यात आली. दोडामार्ग पोलीस निरीक्षक आर. जी. नदाफ यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित गोवा राज्यातून दोडामार्गात दाखल झाले. सासोली तिठय़ाजवळ संशयित मारुती ओमनी गाडीने फिरत असताना दिसून आले. त्यांच्याकडे तपासणी केली असता विनापरवाना बंदूक आढळली. त्यामुळे संशयितांवर शस्त्र अधिनियमान्वये कलम 3(1), 25, 27, भादंवि कलम 34, 188, 269, 270, 271, साथीचे रोग अधिनियम 1897, कलम 3 व 4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.









