उर्फान मुल्ला यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी / पणजी
काँग्रेसमधून राजीनामा दिलेले अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष उर्फान मुल्ला यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. गोव्यातील सर्व मुस्लिम बांधवाना भाजपामध्ये आणून त्यांची मते भाजपाला मिळवून देणार आणि ज्या मतदारसंघात भाजपाचा आमदार निवडून आला नाही तेथे निवडणून आणण्याचे आश्वासन मुल्ला यांनी यावेळी दिले.
पणजीतील भाजप कार्यालयात हा प्रवेशाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी उपमुख्यमंत्री बाबु कवळेकर, दामू नाईक व भाजप अल्पसंख्यांक विभागाचे पदाधिकारी तसेच प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे उपस्थित होते. कवळेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन तर तानावडे यांनी भाजपचे उपरणे त्यांच्या गळ्यात घालून मुल्ला यांचे भाजपमध्ये स्वागत केले. त्यावेळी मुल्ला यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली.
ते म्हणाले काँग्रेस पक्षातील सर्व माजी 5 मुख्यमंत्र्यांची तोंडे पाच दिशांना असून ते तसेच इतर नेत्यांनी अल्पसंख्यांकांचा फक्त मतांसाठी वापर केला आणि स्वार्थ साधला. निवडणुकीपुरते जवळ करणे आणि नंतर सोडून देणे हाच कार्यक्रम काँग्रेसने अनेक वर्षे राबवला. भाजपाबाबत भय निर्माण केले म्हणून आम्ही भाजपापासून अनेक वर्षे लांब राहीलो परंतु आता आम्ही भाजपावासी झालो असून गोव्यातील सर्व मुस्लिम मते भाजपच्या पारडय़ात पडतील असे मुल्ला यांनी नमूद केले. मुस्लिमांचे सर्व प्रश्न समस्या आता मीटतील आणि अशी आशा त्यांनी वर्तवली. तानावडे व कवळेकर यांनी सांगितले की, भाजप हा सर्व धर्मियांना घेवून जाणारा पक्ष असून देशात व गोव्यातही काँग्रेसमधील अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. काँग्रेस पक्षाचे अस्तित्व आता नाहीसे होत असून तेथील कारभाराला कंटाळूनच अनेकजण भाजपकडे येत असल्याचा दावा त्यांनी केला. भाजपचे अल्पसंख्यांक विभागाचे हैदर शहा, शेख जीना व इतर पदाधिकारी उपस्थित होते.