गोव्याने दिली मैत्रीच्या नात्याची प्रचिती : जीवनाशी झुंजणाऱया कोल्हापुरच्या सर्जेरावचा अंतिम प्रवास
महेश कोनेकर / मडगाव
मैत्रीचे नाते हे शब्दांपलिकडचे असते. अनेकदा मोलाची साथ देणारे, रक्ताच्या नात्यांच्यापेक्षा खूप वेळा जवळचे वाटणारे… प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी मित्र असतो. तोच अनेकदा सुख-दुःखाच्या वेळी आधार बनतो. कोल्हापूर जिल्हय़ातील करवीर तालुक्यातील तामगाव येथील सर्जेराव पोवार यांचे शनिवार 2 मे रोजी गोव्यात झुवारीनगर येथे निधन झाले. ‘कोविड-19’ मुळे लॉकडाऊन. त्यामुळे घरची एकही व्यक्ती अंत्यसंस्कारास पोहचू शकली नाही. अशा वेळी सर्जेरावावर गोव्यातीलच त्यांच्या मित्रांनी अत्यंस्कार करताना, मित्रत्वाचे नाते किती महान असते याचा प्रत्यय आणून दिला.
सर्जेराव पोवार (46) हा कोल्हापूरच्या तामगाव मधील. ‘टर्नर’ म्हणून पुण्यातील एका कंपनीत कामाला होता. पती-पत्नी या कौटुंबिक वादाच्या कलहात तो पिसलेला. त्यात भर म्हणून त्याला कॅन्सरने ग्रासलेले. त्याच्या कंपनीने पुण्याच्या इस्पितळाऐवजी गोव्यातील गोमेकॉत उपचाराची सोय ईएसआयच्या माध्यमातून केली. कॅन्सरवरील उपचारासाठी तो गोव्यात शिफ्ट झाला. उपचार सुरू असतानाच झुवारीनगर-वास्को येथील कंपनीत नोकरी करू लागला.
कॅन्सरवर मात करुनही यातना संपल्या नाही
गोमेकॉतील वैद्यकीय उपचारानंतर जिद्दीने त्याने कॅन्सरवर मात केली. मात्र, त्यांच्या दुःखाचे फेरे इथे संपले नव्हते. कॅन्सरवरील उपचार घेताना मज्जातंतूच्या विकाराने उचल खाल्ली. त्यात त्याचे पाय लुळे पडले. उभे राहण्यासाठी काठी हाच त्याचा आधार बनला. दिव्यांगांसाठी असलेली तीनचाकी स्कुटर घेऊन तो कंपतीत कामावर जाऊ लागला. कंपनीत हजेरी व इतर कामासाठी याच तीनचाकी स्कुटरवरून फिरायचा. गोवा-पुणे-गोवा असा महिन्यातून एकदा तरी प्रवास करीत असे.
लॉकडाऊनमध्ये पडला आजारी
नियतीने दिलेल्या धक्क्यातून सर्जेराव सावरत होता. 21 मार्चच्या दरम्यान तो कोल्हापूर आणि त्यानंतर पुण्याला जाण्यासाठी गोव्यातून निघणार होता. मात्र, ‘कोरोना व्हायरस’मुळे जनता कर्फ्यू लागू झाला व नंतर लॉकडाऊन. त्यामुळे तो गोव्यात अडकला. गेल्या आठवडय़ात 29 एप्रिलपासून त्याला अशक्तपणा जाणवू लागला व आजारी पडला.
ऍम्ब्युलन्स घरापर्यंत पोहोचली अन्
शुक्रवार दि. 1 मे रोजी त्याला ताप आला व प्रकृती नाजूक बनली. त्यावेळी गोव्यातील त्याच्या मित्रांनी त्याला शनिवार दि. 2 रोजी ऍम्ब्युलन्समधून कोल्हापूरला घरी पाठविण्याची व्यवस्था केली. सर्जेरावला नेण्यासाठी ऍम्ब्युलन्स झुवारीनगरातील त्याच्या खोलीपर्यंत आली. तो पर्यत सकाळी 11च्या दरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला होता.
शेवटी मित्रांनीच केले अंत्यसंस्कार
सर्जेराव गेल्याची कल्पना त्याच्या मित्रांनी कोल्हापुरात कुटुंबियांना दिली. त्यावेळी त्याचा मोठा भाऊ संतोषने आईसह गोव्याला येण्याची तयारी सुरू केली. मात्र, लॉकडाऊनमुळे त्यांना दोन्ही राज्यांकडून परवानगी मिळविणे आवश्यक होते. सायंकाळचे साडेपाच वाजले तरी परवानगी मिळणे शक्य झाले नाही. शेवटी सर्जेरावचा मृतदेह घेऊन पाच-सहा तास थांबलेल्या गोव्यातील त्याच्या मित्रांनी सायंकाळी 6 वाजता अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला व झुवारीनगर येथेच अत्यंसंस्कार केले. या कामी सांकवाळचे सरपंच गिरीश पिल्ले यांचे अंत्यंत मोलाचे सहकार्य लाभले.
व्हिडिओ कॉलद्वारे कुटुंबियांनी घेतले अंत्यदर्शन
आईला आपल्या मुलाच्या व भाऊ संतोषला आपल्या भावाच्या अंत्यदर्शनाची इच्छा अपुरीच राहिली. व्हिडिओ कॉलद्वारे कुटुंबियांनी मनावर दगड ठेऊन सर्जेरावचे अंत्यदर्शन घेतले. गेली चार वर्षे कॅन्सर व अपंगत्वाला जिद्दीने सामोरे गेलेल्या सर्जेरावची शेवटच्या क्षणी लॉकडाऊनमुळे कुटुंबियांशी भेटही घडली नाही.
‘अस्थी’ही मित्रांनीच सुपूर्द केल्या
सर्जेरावच्या अस्थी विसर्जनाचा विधी काल बुधवारी होता. त्यासाठी त्याचा भाऊ संतोष हा कोल्हापूरहून गोव्याकडे निघाला. त्यासाठी त्यांनी कोल्हापूर पोलिसांकडून प्रवासी परवाना मिळविला होता. बुधवारी सकाळी जेव्हा ते पत्रादेवीला पोचले, तेव्हा त्यांना गोवा पोलिसांनी अडविले व गोव्यात येण्यासाठी स्थानिक जिल्हाधिकाऱयांची परवानगी आवश्यक असल्याची कल्पना दिली. परवानगीशिवाय आत आला तर क्वारंटाईन करण्यात येईल असे स्पष्ट केले. शेवटी ‘ऑनलाईन’ अर्ज करण्याचा प्रयत्न केला. त्यातही त्यांना यश आले नाही. मग त्यांनी सर्जेरावच्या झुवारीनगरातील मित्रांकडे संपर्क साधला व एकूण परिस्थितीची कल्पना दिली.
मित्रानीच अस्थी पोहोचविल्या चेकपोस्टर
मित्रांनी आपणच सर्जेरावच्या हस्ती घेऊन गोवा व महाराष्ट्रच्या सीमेवर पत्रादेवी चेकपोस्टपर्यंत येतो असे सांगितले. सर्जेरावचे मित्र ‘दीपक’ व ‘अमर’ हे अस्थी घेऊन पत्रादेवीला गेले. तेथे सर्जेरावचा भाऊ संतोषकडे त्या सुपूर्द केल्या व त्यांने घरातून स्मशानात ठेवण्यासाठी आणलेला नैवेद्य स्वीकारला. यावेळी त्यांचे संभाषण सुद्धा झाले नाही.
अशा दुःखद व कठीण प्रसंगी सर्जेरावचे मित्र मदतीला आले नसते तर…. काय परिस्थिती उद्भवली असती याची कल्पनाही आपण करू शकत नाही. त्याच्या मित्रांचे कितीही आभार मानले तरी ते अपुरेच आहेत. त्यांनी केवळ सर्जेराववर अंत्यसंस्कारच केले नाही तर अस्थी कुटुंबियांकडे व्यवस्थितपणे पेचतील याची काळजीही घेतल्याचे संतोष पोवारने तरूण भारतला सांगितले.
अशा संवेदनशील प्रसंगावेळी सरकारने थोडे सहानभूतीने पहावे, जेणे करून कठीण व दुःखातील कुटुंबियांना थोडा तरी दिलासा मिळेल असे ते शेवटी म्हणाले.









