सासोलीतून गोवा सीमेवर गांजा आणून देण्याचे करीत होता काम
तालुक्यातील अनेक संशयित ‘अंडरग्राऊंड’
तिलारी खोऱयातील बहुतांशी शेती-बागायतीच्या आड गांजाची लागवड?
दोडामार्ग पोलीस अनभिज्ञ
तेजस देसाई / दोडामार्ग:
दोडामार्ग शहरालगतच्या नानोडा – गोवा येथून गांजा तस्करीप्रकरणी एकास अटक करून त्याच्यासोबत दोडामार्ग तालुक्यातील सासोली येथील 25 वर्षीय युवकास गोवा पोलिसांनी ताब्यात घेतले. दोन दिवसापूर्वी झालेल्या या कारवाईने नानोडा ते सासोली हे गांजा खरेदी-विक्रीचे कनेक्शन उघड झाले आहे. या कनेक्शनमुळे गोवा व सिंधुदुर्ग पोलिसांची कारवाई होईल, या भीतीने दोडामार्ग शहरातही तालुक्यातील बऱयाच ठिकाणचे संशयित ‘अंडरग्राऊंड’ झाले आहेत.
दोडामार्ग शहरापासून अवघ्या 8 ते 9 किलोमीटरवर असलेल्या नानोडा येथील प्रणित पिल्लई याला शुक्रवारी रात्री त्याच्याकडील एक किलो गांजासह अटक करण्यात आली. गोव्यातील गुन्हा अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पथकाने ही कारवाई केली. या सीआयडी पथकातील निरीक्षक फिलोमेना कॉस्ता व राहुल परब यांच्या पथकाने ही कारवाई केली. प्रणित पिल्लई याचा नानोडा येथे टायर पंक्चर काढण्याचा व्यवसाय आहे. काही वर्षांपूर्वी त्याने नानोडा येथे जमीन घेऊन चांगले घरही बांधले आहे. त्याला त्याच्या व्यवसायातून मिळणारे उत्पन्न व बांधलेले आलिशान घर याचा ताळमेळ बसत नसल्याचे आसपासच्या अनेकांकडून व्यक्त होत होते. त्याच्या कथित गांजा खरेदी-विक्री व्यवसायाची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. अखेर सीआयडी टिमने त्याच्या मुसक्या आवळल्या.
पिल्लईकडून सासोलीचे कनेक्शन उघड
मूळ केरळ येथील असलेल्या या प्रणित पिल्लई याला शुक्रवारी रात्री त्याच्याजवळ एक किलो गांजासह अटक केली. आपला खाक्या पोलिसांनी दाखवताच प्रणितने धडाधड बोलण्यास सुरुवात केली. त्यातून दोडामार्ग तालुक्यातील सासोली येथील सोमेश गांजील या 25 वर्षीय युवकाचे नाव पुढे आले. या गांजा तस्करी सासोलीचा हा युवक मध्यस्थ म्हणून काम करत होता. सासोलीतून दोडामार्ग शहरालगतच्या गोवा सीमेलगत गांजा आणून देण्याचे काम सोमेश करत होता. ही माहिती प्रणित पिल्लईने गोवा पोलिसांना दिल्यावर या पथकाने सासोली येथील सोमेश गांजीलला देखील ताब्यात घेतले. सासोलीमधील या कारवाईची माहिती सर्वदूर होताच दोडामार्ग शहरासह संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली.
दोडामार्ग तालुक्यातील गांजा थेट गोव्यात?.
सासोली येथील सोमेश गांजील हा आपल्या विभागातून गोवा सीमेवर गांजा आणून देण्याचे काम करत होता, अशी माहिती प्रणित पिल्लईने पोलिसांना दिल्याने सोमेशला अटक करण्यात आली. त्याचबरोबर त्याने नेमका गांजा कुठून व कसा मिळवला, याची चर्चा आता सुरू झाली आहे. खुद्द दोडामार्ग शहरातील तसेच तालुक्यातील बहुतांशी गावातील युवक गांजाच्या आहारी गेल्याचे दबक्या आवाजात नेहमी बोलले जाते. त्याचबरोबर अलीकडेच काही वर्षापूर्वी एक दोघांवर गांजा प्रकरणी गोवा पोलिसांची कारवाई देखील झाली होती. मात्र, दोन्ही खेपेस गोवा पोलीसच येऊन कारवाई करतात. त्यामुळे सिंधुदुर्ग पोलिसांना गांजा संदर्भात काहीच माहिती नाही का? असा थेट सवाल आता येथील जनतेमधून विचारला जात आहे. तिलारी खोऱयातील बहुतांशी शेती-बागायतीच्या आड परप्रांतीयांनी या गांजाची लागवड केल्याचे बोलले जाते. परंतु त्यासंदर्भात आतापर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने काल-परवा उद्भवलेले हे गांजा प्रकरण पुन्हा एकदा थंडावण्याची शक्यता आहे.