क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
लखनौत झालेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत गोव्याच्या तनिशा क्रास्टो हिने मिश्र दुहेरीत जेतेपद मिळविले. ती या स्पर्धेत मिश्र दुहेरीत इशान भटनागरच्या साथीने खेळत होती. अंतिम लढतीत तनिशा व इशान जोडीने टी. हेमा नागेंद्र बाबू व श्रीवेदय़ा गुराझादा यांचा 21-16, 21-12 असा सहज पराभव केला.
हल्लीच स्कॉटीश आंतराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत आकर्षक कामगिरी करून रौप्यपदक मिळविलेल्या तनिशा-इशान जोडीने उपान्त्य लढतीत एम. आर. अर्जुन व त्रिझा जॉलीचा पहिल्या सेटच्या पिछाडीनंतर 18-21, 21-18, 21-11 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. त्यापूर्वी झालेल्या उपान्त्यपूर्व लढतीत तनिशा-इशान जोडीने गोव्याच्या प्रांजल चिमुलकर व तिचा साथी अशिथ सुर्याचा 21-13, 21-19 असा पराभव करून उपान्त्य फेरीत प्रवेश मिळविला होता.









