क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
आय-लीग फुटबॉल स्पर्धेचा 2020-21 मोसमातील केरळचा गोकुळम केरळ संघ चॅम्पियन क्लब बनला आहे. काल कोलकातातील किशोर भारती क्रीडांगण मैदानावर खेळविण्यात आलेल्या निर्णायक लढतीत गोकुळम केरळने ट्रावचा 4-1 गोलांनी पराभव केला. स्पर्धेत गोव्याच्या चर्चिल ब्रदर्स स्पोर्ट्स क्लबला उपविजेतेपद तर ट्राव संघाला तिसरे स्थान प्राप्त झाले.
या सामन्यात जेतपदासाठी गोकुळम केरळ आणि ट्राव यांचे समान 26 गुण होते. चर्चिल ब्रदर्स क्लबचेही 26 गुण होते. मात्र या दोन्ही संघांची गोलसरासरी चर्चिल ब्रदर्स संघापेक्षा जास्त होती. गोकुळम केरळने ट्राव संघावर विजय नोंदवून आपली गुणसंख्या 29 अशी केली. चर्चिल ब्रदर्स स्पोर्ट्स क्लबचेही गोकुळम केरळप्रमाणे समान 29 गुण झाले. मात्र गोकुळम केरळची गोल डिफरन्स 13 आणि चर्चिल ब्रदर्सचा केवळ 5 असल्याने केरळच्या संघाला यंदाच्या आय-लीग स्पर्धेचे जेतेपद प्राप्त झाले.
काल गोकुळम केरळने पहिल्या सत्रातील पिछाडीवरून दुसऱया सत्रात चार गोल केले. सामन्याच्या 24व्या मिनिटाला बिद्यासागर सिंगने गोल करून ट्राव संघाला आघाडीवर नेले. त्यानंतर दुसऱया सत्रात सात मिनिटांत गोकुळम केरळने तीन गोल केले आणि तिथेच आपल्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. गोकुळम केरळसाठी शरीफ मोहम्मद, इमील बॅनी, डॅनी अँट्वी व मोहम्मद रशीदने प्रत्येकी एक गोल केला.
दुसऱया सामन्यात चर्चिल ब्रदर्स स्पोर्ट्स पंजाब फुटबॉल क्लबला 3-2 गोलांनी पराभूत केले, मात्र हा विजय गोव्याच्या चर्चिल ब्रदर्स स्पोर्ट्स क्लबला जेतेपद मिळवून देण्यास पुरेसा ठरला नाही. चर्चिल ब्रदर्स क्लबने पहिल्या सत्रातच तीन गोल नोंदवून प्रतिस्पर्धी संघावर मोठी आघाडी घेतली होती. त्यांच्या लुका मॅजसेनने आठव्याच मिनिटाला पेनल्टीवर गोल करून संघाला आघाडी घेऊन दिली. त्यानंतर क्लेवीन जुनेगाने 24व्या आणि पहिल्या सत्रातील इंज्युरी वेळेतील तिसऱयाच मिनिटाला दोन गोल केले.
दुसऱया सत्रात 66व्या मिनिटाला बाबा दिवाराने तर 69व्या मिनिटाला मोहेसोन तोंगब्राम सिंगने पंजाब एफसीचे दोन गोल करून सामन्यात रंगत आणली. चर्चिल ब्रदर्स संघाला आपलया मागील दोन सामन्यात पराभूत झाल्याने जेतेपदाला मुकावे लागले. काल जेतेपद मिळाले असते तर गोव्याच्या या फॅमिली क्लबला तिसऱयांदा आय-लीगच्या जेतेपदावर नाव कोरता आले असते.
आय-लीग विजेत्या केरळच्या गोकुळम केरळ संघाला जेतेपदाचे रोख 1 कोटी, उपविजेत्या चर्चिल ब्रदर्स स्पोर्ट्स क्लबला रोख 60 लाख, तिसरे स्थान मिळविलेल्या ट्राव क्लबला रोख 40 लाख तर चौथे स्थान मिळालेल्या पंजाब एफसी संघाला रोख 25 लाख प्राप्त झाले.
वैयक्तिक बक्षिसे याप्रमाणेः स्पर्धेत सर्वाधिक गोल नोंदविणारा फुटबॉलपटू- बिद्यासागर सिंग (2.5 लाख, ट्राव एफसी), हिरो मोटा कॉर्प उत्कृष्ट गोलरक्षक – किरण लिंबू (रोख 2.5 लाख. पंजाब एफसी), उत्कृष्ट डिफेंडर जर्नेल सिंग पुरस्कार – हामजा खीर (रोख 2.5 लाख, चर्चिल ब्रदर्स स्पोर्ट्स क्लब), उत्कृष्ट मीडफिल्डर – फाल्गुनी सिंग (रोख 2.5 लाख, ट्राव एफसी), स्पर्धेतील प्रतिभावंत फुटबॉलपटू- इमील बॅनी (रोख 2.5 लाख, गोकुळम केरळ), उत्कृष्ट प्रशिक्षकासाठी असलेला सय्यद अब्दुल रहीम पुरस्कार- नंदाकुमार सिंग (ट्राव एफसी), हिरो ऑफ दी लीग पुरस्कार – बिद्यासागर सिंग (रोख 5 लाख, ट्राव एफसी).









