क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
गोव्याचा कुमार बुद्धिबळपटू इथॅन वाझने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत पुन्हा एकदा कमाल करताना फिडे विश्वचषक स्पर्धेत उपविजेतेपदाचे तिसरे स्थान म्हणजे क्रमवारीत चौथे स्थान मिळविले. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या सहकार्याने कॅडेट्स आणि यूथ तसेच 10 वर्षांखालील खुल्या गटातील या स्पर्धेचे आयोजन जॉर्जियन चेस महासंघाने केले होते.
स्वीस लीग पद्धतीने दहा राऊंडच्या या स्पर्धेत 73 देशांतील 227 कुमार बुद्धिबळपटूंनी या स्पर्धेत भाग घेतला होता. यात भारतातील 20, अमेरिकेतील 16 आणि रशियातील 11 खेळाडूंचा समावेश होता. गोव्याच्या वाझला या स्पर्धेत 1384 एलो गुणांनी 48वे मानांकन लाभले होते. मात्र गोव्याच्या या प्रतिभावंत बुद्धिबळपटूने चतुरस्त्र खेळाच्या बळावर दहावे स्थान मिळविले. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी इथॅनचा भारतील संघातील मानांकन पाचवे होते.
या स्पर्धेत पहिल्या दहा खेळाडूंत स्थान मिळविल्याने आता इथॅन वाझने येत्या महिन्यात होणाऱया विश्वचषक नॉक-आऊट स्पर्धेत खेळण्यासाठी पात्रता मिळविली आहे. या स्पर्धेत प्रथम दहा स्थान मिळविलेले खेळाडू तसेच अन्य सहा खेळाडू असे एकूण 16 खेळाडू 10 वर्षांखालील गटात विश्वचषक स्पर्धेत खेळतील.
इथॅनने आपल्यापेक्षा अधिक मानांकन असलेल्या सात खेळाडूंना चांगलीच झुंज दिली आणि 10 सामन्यांतून 7 विजय आणि 2 बरोबरीने 8 गुणांची कमाई केली. एका सामन्यात त्याला पराभव स्वीकारावा लागला. स्पर्धेत उपविजेतेपद मिळविलेल्या कझागस्थानच्या स्मीरनोव्ह मार्क याच्याकडून त्याचा पराभव झाला. इथॅनने अमेरिकेच्या तीन तर रशिया, तुर्क व्हियतनाम आणि कॅनडाच्या प्रत्येकी एका खेळाडूचा पराभव केला. रशिया आणि चिली देशांच्या खेळाडूबरोबरचे त्याचे सामने अनिर्णीत राहिले.
स्पर्धेच्या अंतिम दिवशी इथॅनचे 8 सामन्यांतून 6.5 गुण होते व त्यामुळे त्याला पोडियमवर स्थान मिळण्याची संधीही होती. मात्र नवव्या लढतीत त्यांचा रशियाचा स्टार बुद्धिबळपटू डिमित्री पेटूखोव्हविरूद्धचा सामना बरोबरीत सुटला आणि त्याची पोडियमवर स्थान मिळविण्याची पकड ढिली झाली. 9 सामन्यांतून 9 गुणांची कमाई केलेल्या कझाकस्थानच्या मार्कला दहाव्या फेरीत पराभव स्वीकारावा लागल्याने इथॅन चौथ्या स्थानावर गेल्याने त्याचे ब्राँझपदक हुकले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून कौतुक
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या या कुमार बुद्धिबळपटू इथॅन वाझच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीचे कौतुक केले आहे. इथॅनने हल्लीच आशियाई शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करताना सांघिक सुवर्णपदक मिळविले. त्यानंतर काल फिडे विश्वचषक स्पर्धेत उपविजेतेपदाचे तिसरे स्थान मिळविले.
73 देशांतील खेळाडूंचा समावेश असलेल्या या स्पर्धेत शानदार कामगिरी करून इथॅनने कुमार गटातील विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत खेळण्याची पात्रता मिळविली असून राज्यासाठी ती अभिनंदनीय बाब असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यावेळी म्हणाले. गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष तथा वीजमंत्री नीलेश काब्राल आणि सचिव किशोर बांदेकर यांनीही इथॅनच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळ स्पर्धेतील चौफेर कामगिरीचे कौतुक केले आहे.









