प्रोफेशनल क्रिकेटपटूंची निवड करण्यासाठी उद्या पीसीएवर पाच जणांची होणार चाचणी
क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
गोव्याचे यंदाच्या मोसमातील रणजी क्रिकेट प्रशिक्षक भास्कर पिल्ले यांचे आज गुरूवारी सायंकाळी आगमन होणार आहे. त्यानंतर शुक्रवारी त्यांची जीसीएच्या पर्वरी मुख्यालयात सचिव विपुल फडके आणि सीनियर संघ निवड समितीच्या सदस्यांबरोबर संयुक्त बैठक होईल.
जीसीएने निवडलेल्या संभाव्य रणजीपटूंचा ताबा ते शुक्रवारी घेतील आणि संघ त्यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतील. जीसीएने यंदाच्या मोसमात एकनाथ केरकर याला प्रोफेशनल क्रिकेटपटू म्हणून यापूर्वीच निश्चित केले आहे. आता उद्यापासून आणखी दोन प्रोफेशनल क्रिकेटपटू निवडण्याच्या प्रक्रियेला सुरूवात होणार असल्याचे जीसीएचे सचिव विपुल फडके म्हणाले.
आम्ही सध्या वेगवान गोलंदाज आणि काही प्रमाणात फलंदाजी करणाऱया क्रिकेटपटूंची चाचणी करणार आहोत. त्यासाठी आमच्याकडे आलेल्या अर्जांपैकी विकास टोकस, सुबोध भाटी, दिपक पुनिया, श्रीकांत वाघ आणि श्रीकांत रांजणे यांना चाचणीसाठी शुक्रवारी बोलाविले आहे. भास्कर पिल्ले यांनी आम्ही प्रथम वेगवान गोलंदाजांची चाचणी घेऊ असे सांगितले आहे, असे विपुल फडके म्हणाले.
आम्हाला प्रोफेशनल क्रिकेटपटूंसाठी निव्वळ फलंदाज असलेल्याचेही अर्ज पुष्कळ आले आहेत. वेगवान अष्टपैलू गोलंदाजांची चाचणी संपल्यानंतर शक्य असल्यास आम्ही परराज्यातील फलंदाजांनाही चाचणीसाठी आमंत्रण देऊ शकतो असे फडके म्हणाले. चाचणीसाठी येणारा दिल्लीचा 34 वर्षीय विकास टोकसने 15 प्रथमक्षेणी सामन्यांतून 32 विकेट्स तर 30 वर्षीय सुबोध भाटीने 8 प्रथमक्षेणी सामन्यांतून 19 विकेट्स आणि 147 धावा केल्या आहेत.
सौराष्ट्र आणि सेनादल संघांसाठी रणजी स्पर्धेत खेळलेल्या दिपक पुनिया हा सुद्धा शुक्रवारी चाचणी देणार आहे. दिपकने 20 प्रथमक्षणी सामन्यांत 509 धावा आणि 34 गडी बाद केले आहेत. विदर्भचा अनुभवी श्रीकांत वाघ या अष्टपैलू क्रिकेटपटूचा बायो डाटा भक्कम आहे. 32 वर्षीय श्रीकांतने 64 प्रथमक्षेणी सामन्यांत एक शतक आणि पाच अर्धशतकांनी 1646 धावा केल्या असून 161 गडीही बाद केले आहे. मुंबईसाठी खेळलेल्या शुभम रांजणेचीही चाचणी शुक्रवारी प्रशिक्षक भास्कर पिल्ले यांच्यासमोर होणार असून शुभमने 12 प्रथमक्षेणी सामन्यांत 513 धावा तसेच 5 विकेट्सही घेतल्या आहेत.









