केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सर्वेक्षण जाहीर
प्रतिनिधी /पणजी
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत गोव्यात करण्यात आलेल्या आरोग्य सर्वेक्षणात गोव्यातील जनतेची आरोग्य स्थिती इतर राज्यांच्या तुलनेत भक्कम असून व्यसनाचे प्रमाण वाढू लागल्याने चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
नेल्सन इंडिया प्रा. लि या आस्थपनाने केंद्र सरकारसाठी सदर सर्वेक्षण केले होते. दि. 30 ऑगस्ट 2019 ते 26 नोव्हेंबर 2019 या कालावधीत प्रत्येक तालुक्यातील साधारण 100 घरांत जाऊन माहिती गोळा करण्यात आली. एकूण 2030 महिलांनी तर 1313 पुरुषांनी दिलेल्या तपशीलातून अंदाज व्यक्त करुन सदर टक्केवारी जाहीर करण्यात आली आहे.
मद्यपानाच्या प्रमाणात वाढ
गोव्यात तंबाखू आणि मद्यपान व्यसनाच्या प्रमाणात वाढ दर्शविण्यात आली आहे. मागच्या सर्वेक्षणाच्या तुलनेत मद्यपान प्रमाणात वाढ आहे. गोव्यात 15 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या पुरुषांपैकी 36.9 टक्के पुरुष मद्यसेवन करतात. त्यात शहरी भागात 38.2 टक्के तर ग्रामीण भागात 34.9 टक्के पुरुष मद्यपान करतात असा अंदाज बांधण्यात आला आहे. राष्ट्रीय प्रमाण 25 टक्क्यापेक्षा कमी असून गोव्यात मद्यपान प्रमाण जवळ जवळ 35 टक्के आहे. महिलांमध्ये मद्यपानाचे प्रमाण 5.5 टक्के आहे.
तंबाखूचे व्यसन 18.2 टक्के
तंबाखूचे व्यसन पुरुषांमध्ये 18.2 टक्के आहे. त्यात शहरात 19.5 टक्के तर ग्रामीण भागात 16.3 टक्के आहे. महिलांमध्ये तंबाखू वापरण्याचे प्रमाण ग्रामीण भागात 2.8 टक्के तर शहरी भागात 2.4 टक्के आहे व सरासरी 2.6 टक्के गोव्यातील महिला तंबाखूचा वापर करीत असल्याचे या सर्वेक्षणात उघड झाले आहे.
पुरुषांमध्ये मधुमेह अधिक
राष्ट्रीय सरासरीप्रमाणे गोव्यातील जनतेचे आरोग्य चांगले आहे. त्यात पुरुष महिलांपेक्षा आरोग्यात चांगले असल्याचे आढळले आहे. मधुमेहाच्या आजाराचे महिलांमधील प्रमाण 20.8 टक्के आहे तर पुरुषांमध्ये 24.1 टक्के आहे. ग्रामीण आणि शहरी महिलांची तुलना केल्यास 20.6 टक्के शहरी तर 21.1 टक्के ग्रामीण महिलांमध्ये मधुमेहाचा आजार आहे. पुरुषांमध्ये शहरी भागात 23 टक्के तर ग्रामीण भागात 25.9 टक्के मधुमेहाचे प्रमाण आढळले आहे.
रक्तदाबाचे प्रमाण महिलांत अधिक
गोव्यात रक्तदाबाचा आजार महिलामध्ये 27.5 टक्के आहे. त्यात शहरात 27.6 टक्के तर ग्रामीण भागात 27.4 टक्के आहे. याचाच अर्थ शहरी महिला ग्रामीण महिलांपेक्षा अधिक तणावाखाली जगत आहे. पुरुषांमध्ये रक्तदाबाच्या आजाराचे प्रमाण महिलांपेक्षा कमी आहे. सरासरी 26.8 टक्के हा आजार पुरुषांमध्ये आढळतो तर महिलांचे प्रमाण 27.5 टक्के आहे.
शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील पुरुष अधिक तणावपूर्ण जीवन जगतात असे उघड झाले असून शहरी भागात 25.9 टक्के तर ग्रामीण भागात 28.2 टक्के आहे.
इंटरनेट, मोबाईलचा वापर भरपूर या आरोग्य विषयक सर्वेक्षणात अनेक प्रश्नांमध्ये मोबाईल आणि इंटरनेट वापराचे प्रमाण तपासणारा एक प्रश्न होता. त्या प्रमाणे 82.9 टक्के पुरुष मोबाईल आणि इंटरनेट वापरतात तर 73.7 टक्के महिला इंटरनेट वापरतात. त्यात ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील प्रमाण अधिक असल्याचे आढळले आहे.









