डिचोली / प्रतिनिधी
गेल्या दहा विर्षांमध्ये गोव्याने भाजप सरकारच्या बळावर वेगवेगळी शिखरे गाठली असून आत्मनिर्भर संकल्पनेतून विकेंद्रित पध्दतीने विकास होत आहे. भाजपमुळे गोव्याचा होत असलेला साधनसुविधा आणि मानवविकास पाहता या राज्याला भाजपशिवाय पर्याय नाही. असे असतानाही या राज्यात प्रवेश केलेल्या काही पक्षांकडून गोव्याला प्रयोगभुमी करण्याचा प्रयत्न सध्या चालला आहे. यातील काही पक्ष गेल्या निवडणुकीतही होते, ते त्यानंतर चार वर्षे दिसले नाही. आणि आज ते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा राजकीय प्रयोगासाठी आलेले आहेत. हे पक्ष सायबेरीयन पक्षी असून ते स्थलांतरित झालेले आहेत. ते निवडणुकीनंतर आपापल्या गावात जाणार. ते लोकांसाठी काहीच चांगले करणार नसल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची गरज नाही. तसेच गोव्याची राजकीय प्रयोगभुमी करू देऊ नका, असे आवाहन भाजपचे गोवा राज्य निवडणूक निरिक्षक देवेंद्र फडणवीस यांनी मये येथे केले.
मये पंचायतीजवळ आयोजित जाहिर सभेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, ख सदार विनय तेंडुलकर, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मयेचे भाजप नेते प्रेमेंद्र शेट, मये मंडळ अध्यक्ष दयानंद कारबोटकर, मयेचे प्रभारी प्रेमानंद म्हांबरे, सुलक्षणा सावंत, जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर, महेश सावंत, मये मतदारसंघातील सरपंच, उपसरपंच, पंचसदस्य यांची उपस्थिती होती.
डबल इंजिन सरकारच गोव्याचा भविष्य घडवू शकणार
पूर्वी देशाची आर्थिक राजधानी कोलकाता होती. मात्र या ममता बेनर्जी यांच्या सरकारनेच केलेला छळ यामुळे उद्योजक मुंबईत आले आणि मुंबई आर्थिक राजधानी बनली. बंगालला कंगाल करणारा पक्ष गोव्याचे काय भले करणार. त्यांच्यासाठी हि निवडणुका म्हणजे इव्हेंट आहे. कोणालातरी या निवडणुकीची जबाबदारी देऊन खरेदी विक्री चालू आहे. आज गोव्यात लोकशाही असून कोणीही कुठेही कोणावरही बोलू शकतो. मात्र तृणमूल पक्ष गोव्यात पसरल्यास गोव्यात लोकशाही पेक्षा ठोकशाहीच जास्त चालवणार. दुसरा पक्ष हा अरविंद केजरीवाल यांचा खोटारडेपणाचा पक्ष आहे. जे गोव्यात येऊन केवळ भुलथापा मारत आहेत. काँग्रेस पक्ष तर सध्या आऊटडेटेड झालेला असून त्यात कोणीही रहायला तयार नाही. गोव्यातील विकासाला हात केवळ केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीच देऊ शकतात. त्यामुळे गोव्याला भविष्य केवळ भाजपच देऊ शकते. असेही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी
स्व. अनंत शेट यांच्यामुळेच मयेत भाजप मजबूत
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी, स्व. अनंत शेट यांच्यामुळेच मयेत भाजपची मुळे घट्ट झाली. साखळीप्रमाणेच मये मतदारसंघही आपल्या काळजात असून तो पुढे नेण्यासाठी आपण सदैव झटणार. चोडणचा पुल राहिला आहे. भूसंपादन सुरू केला असून काहीच प्रक्रिया राहिलेली आहे. ती पूर्ण होताच आम्ही पायाभरणी करणार. दिगंबर कामत तसेच सुदिन ढवळीकर यांना राज्याचा विकास समजणार नाही. ते भरकटलेले आहेत. मयेतील प्रेमेंद्र शेटही काही दिवसांपूर्वी भरकटले होते. परंतु आता ते जाग्यावर येऊन पुन्हा स्वगृही परतले आहेत. त्यांचे भाजप पक्षात स्वागत आणि अभिनंदन आहे.
राज्य, देश व लोकप्रथम या तत्वांवर काम करीत आहे.
राज्य, देश आणि लोकप्रथम या तत्वावर आम्ही काम करीत असून लोकांच्या कल्याणासाठी आम्हाला या राज्यातील सत्ता पाहिजे. हे राजकारण आम्ही राज्यासाठी करीत असून राज्यात स्वयंपूर्ण मित्र हि संकल्पना पंतप्रधान मोदी यांनी उचलून धरीत कौतुक केले आणि गोवा मॉडल देशात न्यावा असे गौरवोद्गार काढले. यातच मोठा अभिमान आहे. 2022 मध्ये पुन्हा कमळ फुलणार याचा विश्वास असून मयेचा विषय भाजपच्या सरकारने सोडविण्यासाठी पाऊल टाकले. काहीच प्रमाणात रहिलेला विषय सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहे. आपण आजपर्यंत प्रत्येक काम हे लोकांसाठी केलेले असून अन्याय कोणावरही केलेला नाही. परंतु आज प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक असून फसवणूक करणारे पक्ष राज्यात आलेले आहेत. असेही यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले.
सदानंद शेट तानावडे यांनी यावेळी संघटनेच्या बळावर सदैव भाजपला विजय मिळवून देणारा मतदारसंघ हा राज्यातील मये मतदारसंघ आहे. राज्यात गेल्या 10 वर्षांत केलेल्या कार्याचा अहवाल समोर ठेवणारे पुस्तक भाजपने काढले आहे. सार्वत्रिक विकास आणि लोकोपयोगी योजनांची अंमलबजावणी या सरकारने केली आहेत. राज्यात सध्या तात्पुरती दुकाने थाटून अनेक पक्षांनी शिरकाव केला आहे. त्यांची हि दुकाने निवडणुकीनंतर बंद होणार आहेत. तसेच राज्यात सध्या कार्यरत असलेले पक्षही जनतेचा विश्वास संपादन करण्यास फोल ठरले आहे. राज्यात गेल्या जिल्हा पंचायत आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये भरघोस पाठिंबा दिला आहे. त्याअर्थी येणाऱया निवडणुकीत भाजपचाच मोठा विजय होणार हे निश्चित आहे. असे म्हटले.
यावेळी मयेतील भाजपचे नेते प्रेमेंद्र शेट यांनी, 2012 त राज्यात भाजप सरकार स्थापन झाले आणि मयेत नवीन झळाळी मिळण्यास सुरूवात झाली. मयेचा कायापालट होऊ लागला. माजी आमदार तथा सभापती स्व. अनंत शेट यांनी मयेच्या जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करताना सरकारच्या सहकार्याने मयेत अनेक विकासकामे आणली. सेवा करीत असतानाच स्व. अनंत शेट हे सर्वांना 2020 साली सोडून गेले. त्यांंनी मयेसाठी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जर जनतेने आम्हाला साथ दिल्यास पूर्ण करण्यासाठी झटणार. व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे येणाऱया कार्यकाळात हात बळकट करणार. असे यावेळी मयेतील भाजपचे नेते प्रेमेंद्र शेट यांनी म्हटले.
यावेळी उपस्थित इतरही नेत्यांछी भाषणे झाली. सूत्रसंचालन व आभार विश्वास चोडणकर यांनी केले.









