केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग यांचे मत
प्रतिनिधी/ पणजी
गोव्याची अर्थव्यवस्था आजपर्यंत खाणींवर अवलंबून होती. आता गोवा कृषी आणि सागरी क्षेत्राशी जोडला गेला आहे. त्यामुळे गोव्याची अर्थव्यवस्था यापुढे शेती आणि मत्स्योत्पादनावरच अवलंबून असेल. गोव्याला आत्मनिर्भर बनविण्याच्या दृष्टीने सदर दोन्ही क्षेत्रांचा सुमेळ कसा साधता येईल यावर सरकार गांभीर्याने विचार करत आहे, असे स्पष्ट मत केंद्रीय मत्स्योत्पादन आणि पशुपालन मंत्री गिरीराज सिंग यांनी व्यक्त केले आहे. त्याद्वारे ’आता खाणी विसरा’ असा अप्रत्यक्ष संकेतच त्यांनी दिला असून खाण विषयातील हवाच काढून घेतली आहे.
पणजीत भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी खासदार विनय तेंडुलकर, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, पक्षाध्यक्ष सदानंद तानावडे यांची उपस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मांडलेल्या 2020-21 च्या अर्थसंकल्पातील लोकांपर्यंत न पोहोचलेल्या सर्व बाबी प्रत्येक राज्यात जाऊन सांगाव्या या उद्देशाने केंद्रीय मंत्री सर्व राज्यांना भेटी देत आहेत. त्याचाच भाग म्हणून आपण गोव्यात आलो आहे, असे सिंग यांनी आपल्या भेटीचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले.
या अर्थसंकल्पात ग्रामीण भाग, गरीब लोक, कृषी, शेतकरी, महिला, युवा, ज्येष्ठ, व्यावसायिक या सर्वांना सहभागी करून घेण्यात आले आहे. मोदी सरकारच्या या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांचा विकास, रस्ते, महामार्ग, दळणवळण, संरक्षण, आरोग्य, शिक्षण, संशोधन, या सर्व क्षेत्राना योग्य न्याय देण्यात आला आहे. त्याद्वारे आर्थिकदृष्टय़ा सक्षम व आत्मनिर्भर भारत बनविण्याचे प्रयत्न आहेत. ‘सर्वार्थाने सर्वांसाठी’ असा हा अर्थसंकल्प आहे, असे ते म्हणाले.
पेट्रोलच्या किंमतीत पैशाचीही वाढ नाही
देशात पेट्रोल, डिझेलच्या किंमती भरमसाठ वाढत असल्यामुळे लोक संतप्त बनले असल्याचे सांगितले असता, प्रत्यक्ष अर्थसंकल्पात पेट्रोल, डिझेलच्या दरात एक पैशाचीही वाढ करण्यात आली नसल्याचा दावा सिंग यांनी केला. अबकारी कर कमी करून त्याबदल्यात सेस लावला आहे. त्यामुळे किंमतीत कोणताही फरक येत नाही, असे ते म्हणाले. पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती ठरविण्याचे अधिकार संबंधित कंपन्यांनाच देण्यात आले असल्यामुळे जागतिक बाजारात ठरणाऱया किंमतीनुसार देशात या उत्पादनाच्या किंमती ठरविल्या जातात, असे सिंग म्हणाले.
सुब्रह्मण्यम स्वामींचे ’ते’ मत वैयक्तिक
पेट्रोल, डिझेलच्या किंमतीवरून यापूर्वी खुद्द भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनीही सरकारवर टीका केली होती. त्यात सीतेच्या नेपाळात 53 रुपये तर रावणाच्या लंकेत 51 रुपये प्रती लिटर दराने पेट्रोल विकले जात असताना रामाच्या भारतात मात्र तब्बल 93 रुपये दराने विकले जात आहे, असे म्हटले होते. यासंबंधी सिंग यांना विचारले असता श्री. स्वामी हे वरिष्ठ अर्थतज्ञ आहेत, त्यांनी मांडलेल्या आकडेवारीवर आपण भाष्य करत नाही, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारत हा एक कुटुंब असल्याप्रमाणे वागणूक दिली आहे. जीवनात उतार चढाव हे असतातच, तरीही भारतीय माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी तो स्वाभीमानाने जगू शकेल याची काळजी त्यांनी निश्चितच घेतली आहे, असे सिंग म्हणाले.
शेतकऱयांच्या आंदोलनाचा कृषी उत्पादनावर परिणाम नाही
देशात सर्वाधिक अन्नधान्य उत्पादन करणाऱया पंजाबमधील शेतकऱयांनी गत दोन महिन्यांपासून दिल्लीत आंदोलन आरंभले असले तरी त्याचा देशाच्या अन्नधान्य उत्पादनावर कोणताही परिणाम होणार नाही, असे श्री. सिंग यांनी अन्य एका प्रश्नावर ठामपणे सांगितले. पंजाबातून ज्या प्रमाणात अन्नधान्याची खरेदी होत होती त्यात कोणतीही कमतरता आलेली नाही. याउलट अन्नधान्य उत्पादनात गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाढच नोंदविली गेली असल्याचेही ते म्हणाले.









