प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावचे थोर स्वातंत्र्यसेनानी गोविंदराव याळगी यांच्या स्मारकासंदर्भात वरेरकर नाटय़ संघ येथे याळगी कुटुंबाची बैठक पार पडली. बैठकीच्या प्रारंभी स्वातंत्र्यसैनिक विठ्ठल याळगी व पत्रकार सुभाष कुलकर्णी यांच्या हस्त गोविंदराव याळगी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. विद्या याळगी यांनी ‘जयोस्तुते श्री महन्मंगले..’ हे गीत सादर केले.
स्वातंत्र्य लढय़ात बेळगावच्या याळगी कुटुंबाचे खूप मोठे योगदान असून याळगी घराण्याचे प्रेरणास्थान असलेले थोर स्वातंत्र्यसेनानी गोविंदराव याळगी यांचे बेळगावात स्मारक व्हावे, अशी इच्छा याळगी कुटुंबाने व्यक्त केली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी होते. तसेच पत्रकार सुभाष कुलकर्णी, प्रा. आनंद मेणसे, व्यंगचित्रकार जगदीश कुंटे, सुधीर जोशी, विनय याळगी, डॉ. सतीश याळगी, अभय याळगी, सुहास याळगी, अतुल याळगी व याळगी कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. बैठकीत स्मारकाच्या रूपरेषेविषयी विचारविनिमय होऊन पुढील बैठक घेण्याचे ठरले.









