प्रतिनिधी / पणजी
गोवा विमानतळाने जारी केलेल्या चार पैकी दोन फोटोंनी गोवा सरकारच्या कोरोनाचा सामना करण्याच्या एकंदर तयारीचा भांडाफोड झाला असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे दावे जमीनदोस्त झाले आहेत. गोवा सरकार औषधे व उपकरणांची वाहतूक करण्यासाठी ऍम्बुलन्सचा वापर करते हे या घटनेने उघड झाले आहे व ते अत्यंत दुर्दैवी आहे असा आरोप गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.
काँग्रेस पक्ष अगदी सुरूवातीपासून सरकारच्या कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी सरकारने उचलेली पाऊले व एकंदर तयारीबद्दल शंका उपस्थित करता आला आहे. मुख्यमंत्री व इतर सहकारी मंत्री आमच्या प्रश्नांना नेहमीच बगल देत परस्पर विरोधी विधाने करून मुद्दाम गोंधळ निर्माण करीत होते. सरकारने कोविड 19च्या एकंदर तपासणी पेलेल्या रूग्णांची आकडेवारी मध्येही तफावत असून मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री परस्पर विरोधी विधाने करून गोंधळात अधिकच भर घालत आहेत. जनतेचा भाजप सरकारवरचा विश्वास पूर्णपणे उडाला आहे.
मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत आरोग्यमंत्री प्रसारमाध्यमांना काही महत्त्वाची माहिती व आकडेवारी देतात. पत्रकार परिषद असूनही त्याची माहिती मुख्यमंत्र्यांना नसते. डॉ. प्रमोद सावंत व विश्वजित राणे यांच्यातल्या शीतयुद्धाचा तो परिणाम आहे असे पणजीकर म्हणाले.
गोवा विमानतळाच्या ट्विटरवरून गोव्यात खास विमानातून कोविड चाचणी सामग्री आणल्याची माहिती देण्यात आली व त्यासोबत चार फोटो जोडण्यात आले आहेत. यातील दोन फोटोमध्ये चक्क ऍम्बुलन्सचा वापर मालवाहतूक करण्यासाठी केल्याचे दिसत आहे. कोरोना संकट समोर असताना रूग्णांना नेण्यासाठी वापरण्यात येणाऱया रूग्णवाहिकेत सामानाची ने आण करून सरकार लोकांच्या जीवाशीच खेळत आहे हे सिद्ध झाले आहे. राज्यपालांनी त्वरित प्रशासनाचा ताबा आपणांकडे घ्यावा व पंधरा लाख गोमंतकीयांच्या जीवाशी मांडलेला भाजप सरकारचा खेळ थांबवावा अशी मागणी पणजीकर यांनी केली आहे.









