गोवा राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने उत्सवांची मांदीयाळी पुन्हा एकदा मोठय़ा नेटाने सुरू झालेली आहे. राज्यात देशी पर्यटकही दाखल होत असल्याने गोव्यातील समुद्रकिनाऱयांवर या पर्यटकांची रेलचेल दिसून येते. आता गोव्यात शिमगोत्सवी राजवट सुरू होणार आहे.
गोव्यातील विधानसभेच्या सर्व चाळीसही मतदारसंघातील 1722 मतदान केंद्रांवर झालेल्या मतदानाची आज 10 मार्च रोजी मतमोजणी होत आहे. आज दुपारी 12.30 वा. पर्यंत निकाल हाती येण्याची अपेक्षा आहे.
अखेर एकदाचा सरकारी कार्निव्हल आटोपला आहे. आचारसंहितेमुळे यंदा राजकारणी व त्यांचे बगलबच्चे यांना त्यात मिरवता आले नाही. त्यामुळे त्यांचा चांगलाच हिरमोड झाला. आता शिमगोत्सवात नवीन सत्ताधारी मंडळ स्थापन होणार असून त्यांना खऱया अर्थाने शिमगोत्सवाचा मान लाभणार आहे. फेटे बांधून ऐटीत ते शिमगोत्सवात मिरविणार, हे नक्की. विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि आता शिमग्याच्या मोसमात देवस्थान समितीच्या निवडणुका होणार आहेत. 13 मार्चला राज्यातील सर्व नोंदणीकृत देवस्थान समित्यांची निवडणूक असल्यामुळे इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आता देवस्थान निवडणुकीचे वारे गावागावात वाहू लागले आहे. पंचायत निवडणुकांचेही वेध आता राज्याला लागले असून त्यासाठीही मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
गोवा राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने उत्सवांची मांदीयाळी पुन्हा एकदा मोठय़ा नेटाने सुरू झालेली आहे. राज्यात देशी पर्यटकही दाखल होत असल्याने गोव्यातील समुद्रकिनाऱयांवर या पर्यटकांची रेलचेल दिसून येते. गोवा पर्यटकांनी फुलून गेला आहे. राज्य सरकारतर्फे नुकताच कार्निव्हल मोठय़ा उत्साहात साजरा झाला. यात देशी-विदेशी पर्यटकांनीही सहभाग दर्शविला. काही विदेशी पर्यटकांनी स्वतंत्ररित्या अभिनव कार्निव्हल किनारपट्टींवर साजरा केला. इंत्रुज मेळ मिरवणुकही उत्साहात झाली. भाविकांनी याचा मनसोक्त आनंद लुटला. आता गोव्यात शिमगोत्सवी राजवट सुरू होणार आहे. कोरोनामुळे सध्या दगावण्याचे प्रकार सुरूच असल्याने कोरोनाचे नियम पाळून हा उत्सव साजरा करणे अगत्याचे आहे.गोव्यातील श्रीस्थळ-काणकोण येथील श्री मल्लिकार्जुन देवस्थानचा श्री अवतार पुरुषाचा कौल, अवसर, तळय़ा, वीरामेळ, शिमगोत्सव, दिवजोत्सव व शिमग्याची जत्रा प्रसिद्ध आहे. हा उत्सव काल 9 मार्चपासून सुरू झाला आहे. फोंडा तालुक्यातील गावठण-प्रियोळ येथील श्री बेताळ देवस्थानच्या शिमगोत्सवाला आज गुरुवार 10 पासून सुरुवात होत आहे. येत्या 17 मार्चपासून अन्य गावात होळी पेटविल्यानंतरच पारंपरिक शिमगोत्सवाला प्रारंभ होईल. होळी पेटविल्यानंतर गावागावात ‘शबय, शबय’ व ढोल-ताशांच्या ‘घुमचे कटर घुम’ निनादासह शिमग्याचा उत्साह संचारणार आहे. काही भागात पाच तर काही ठिकाणी सात ते नऊ दिवस शिमगा पारंपरिक पद्धतीने साजरा करतात. धुलीवंदन, चोरोत्सव, रोमट आदी पारंपरिक प्रकार त्या-त्या भागातील शिमगोत्सवाचे वैशिष्टय़ आहे. शिमगोत्सवानिमित्त आता गावागावात ढेल-ताशांची दुरुस्ती तसेच जमवाजमव सुरू झाली आहे. सरकारी पातळीवरील शिमगोत्सवाला दि. 19 मार्च रोजी फोंडय़ातून प्रारंभ होत आहे. पर्यटन खात्यामार्फत यंदा राज्यातील पाच शहरात शिमगोत्सवानिमित्त मिरवणुका निघतील. पहिली चित्ररथ मिरवणूक 19 मार्च रोजी फोंडय़ात होणार असून 20 मार्च रोजी मडगाव, 22 रोजी वास्को, 26 रोजी पणजी तर 27 मार्च रोजी म्हापशात चित्ररथ मिरवणूक काढण्यात येणार आहे. चित्ररथ देखावे, रोमटामेळ, लोकनृत्य, वेषभूषा अशा विविध स्पर्धांची यात रेलचेल असेल. गोमंतकीय शिमगोत्सवाला मोठी परंपरा लाभलेली आहे. याद्वारे गोव्याच्या संस्कृतीचे यथार्थ दर्शन घडते. दरवर्षी गोव्यात हा उत्सव मोठय़ा जल्लोषात साजरा केला जातो. यामध्ये सहभागी होणारे चित्ररथ रसिकांच्या डोळय़ांचे पारणे फेडणारे असतात. बेधुंद नृत्य करणारी रोमटामेळ पथके, लक्षवेधी घोडेमोडणी नृत्य, प्रत्येक पथकाच्या पोषाखातील विविधता आदींमुळे हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी जनसागर लोटतो. गोव्याची पारंपरिक वेशभूषा, विविध पौराणिक कथानकांवर आधारित चित्ररथ व हलते देखावे यामुळे गोव्याची संस्कृती व लोककलेचे दर्शन घडणार आहे. गोव्याची लोककला मनाला भुरळ घालणारी आहे. लोककला ही केवळ कला नसून पारंपरिक संस्कृतीचे दर्शन देणारी आहे.
पेडणेपासून काणकोणपर्यंत शिमगोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. शिमगोत्सव म्हणजे लोकगीत, लोकसंगीत, ऐतिहासिक वारसाची महती सांगणारा. त्याचप्रमाणे परंपरेने जोपासलेला लोकविश्वास, श्रद्धा यांच्या बळावर आजवर टिकून असलेल्या शिमगोत्सवाची रुपे अनंतकाळापर्यंत टिकावीत व भावी पिढीला त्याची ओळख घडावी, या हेतूने हे संचित जपणे गोमंतकीयांचे कर्तव्य आहे. शिमगोत्सव काळात डिचोलीतील बोर्डे, पिळगाव, कुडणे, कारापूर आदी काही ठराविक भागात पारंपरिक पद्धतीने गडे उत्सव साजरा करण्यात येतो. साळ गावातील गडे उत्सव प्रसिद्ध आहे. शिमगोत्सवात काही भागात पारंपरिक लोकनृत्य असलेल्या घोडेमोडणी प्रकारामध्ये लोककलेचे दर्शन घडते. विदेशी पर्यटकांनाही गोमंतकीय शिमगोत्सव आकर्षित करीत आहे.
गोवा म्हणजे जणू ‘खा, प्या, मजा करा’ अशी ओळख. गोव्याला समुद्रकिनाऱयावरील संस्कृती असल्यामुळे संगीत रजनी, पाटर्य़ांचा सुकाळ, अमलीपदार्थ व्यवसाय, मद्यालये आदी बाबींमुळे ही ओळख निर्माण होणे साहजिकच आहे. या पलीकडेही या ठिकाणी संस्कृती नांदते, हे जगासमोर सिद्ध करणे आता गोमंतकीयांची जबाबदारी आहे. अशाप्रकारच्या उत्सवातून हे सहज शक्य आहे. गोवा ही भोगभूमी नसून ती देवभूमी, संतभूमी, योगभूमी आहे, हे साऱया जगाला पटवून देण्याची जबाबदारी गोमंतकीयांची आहे. शिमगोत्सव व गोव्यातील अन्य पारंपरिक उत्सवांचे संवर्धन होणे आवश्यक आहे. गोव्यातील किनाऱयांवर फुगडी, भजन, नाटके, तियात्र, धालो, ओव्या तसेच विविध संस्कृतीप्रधान सण, उत्सवही होतात. गोमंतकीय संस्कृतीचा उदोउदो होतो, हे दाखवून देण्याची ही वेळ आहे. अमलीपदार्थांच्या विळख्यात अडकलेल्या, पाश्चात्य संस्कृतीचा उदोउदो करणाऱयांना आता गोमंतकीय संस्कृतीचा डोस पाजण्याची नितांत गरज आहे. शिमगोत्सव, नाटके तसेच अन्य लोकसंस्कृती जपणारे उत्सव गोवा राज्यात टिकले तरच गोंयकारपण खऱया अर्थाने शाबूत राहील. हे संचित जपण्यासाठी सरकारने तसेच विविध क्षेत्रातील कलाकारांनी आतापासूनच कार्यरत राहणे गरजेचे आहे.
राजेश परब








