राज्यातील डॉक्टर मंडळींचे मत
प्रतिनिधी / पणजी
गोवा ‘मास्क मुक्त’ करण्याची घाई सरकारने करू नये आणि मास्कची अट आणखी 2 ते 3 महिने तरी कायम ठेवावी, असे मत राज्यातील डॉक्टर मंडळींनी व्यक्त केले आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी तो पूर्णपणे संपलेला नाही. या आधी कोरोना कमी झाला, पुन्हा वाढला असा प्रकार दोन-तीन वेळा तरी झालेला आहे. शिवाय चीन-युरोपीय देशात पुन्हा कोरोनाचे थैमान सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर गोवा राज्य तातडीने ‘मास्क मुक्त’ करणे धोकादायक ठरू शकते, असे मत काही डॉक्टरांनी मांडले आहे.
आजारी, वृद्ध माणसांना मास्क आवश्यक
आजारी, वृद्ध माणसे यांना मास्क आवश्यक असून प्रमुख सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे महत्त्वाचे आहे. विमानतळ, रेल्वेस्थानके, बसस्थानके व इतर ठिकाणे मास्कपासून मुक्त करू नयेत. गोवा हे पर्यटनस्थळ असल्याने देश-परदेशातून पर्यटन प्रवासी यांची ये-जा चालू असते. त्यांच्यापासून संसर्ग वाढू शकतो. म्हणून ‘मास्क’ काढण्याची घाई करू नये, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
कोरोनाचा नवीन अवतार धोकादायकच
कोरोनाचा नवीन अवतार आलेला असून तो धोकादायक असल्याने सर्वांनीच काळजी घेण्याची गरज डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. सरकारने मास्क मुक्तीची अतिघाई करू नये. तसा निर्णय घेतला असेल तर तो बदलावा. आणखी दोन-तीन महिने वाट पाहून मागच मास्क मुक्तीचा निर्णय घ्यावा, अशी सूचना डॉक्टर मंडळींनी केली आहे.
मास्क लावणे आरोग्यासाठी महत्त्वाचेच
मास्क लावणे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे धूर, धुळ इतर संसर्गापासून संरक्षण मिळते. परिणामी सरकारने जरी ‘मास्क मुक्ती’ केली तरी लोकांनी स्वतःच्या काळजीसाठी मास्क लावला पाहिजे. 50 वर्षांवरील व आजारी व्यक्तींनी मास्क घालावा, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.









