प्रतिनिधी/ वास्को
इटलीहून खलाशांना घेऊन गोव्याकडे प्रयाण केलेले विमान काल शुक्रवारी पहाटे दीडच्या सुमारास दाबोळी विमानतळावर दाखल झाले. या विमानातून एकूण 276 खलाशी उतरले. या 276 मध्ये 206 गोमंतकीय असून 70 महाराष्ट्रातील आहेत.
दाबोळी विमानतळावर दाखल होताच, पहाटेच त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना कदंबच्या बसमधून क्वारंटाईनसाठी पाठवण्यात आले. 276 खलाशांपैकी 206 गोमंतकीय खलाशांना उत्तर गोव्यात तर महाराष्ट्रातील 70 खलाशांना महाराष्ट्रात क्वारंटाईनसाठी रवाना करण्यात आले. यापूर्वी तीन विमानांतून 416 गोमंतकीय खलाशी इटलीहून गोव्यात दाखल झाले आहेत.
शुक्रवारी दाबोळी विमानतळावर 87 प्रवासी दाखल
देशांतर्गंत हवाई सेवा सुरू झाल्यानंतर काल शुक्रवारी पाचव्या दिवशी दाबोळी विमानतळावर 87 हवाई प्रवासी उतरले. दुपारच्या वेळी दोन तर सायंकाळी एका विमानाचे आगमन झाले. परतीच्या प्रवासात तीन विमानांतून 133 प्रवाशांनी दिल्लीला तर 112 प्रवाशांनी बेंगळूरला जाण्यासाठी उड्डाण केले.
सोमवारी पहिल्याच दिवशी दाबोळी विमानतळावर केवळ तीन विमाने दाखल झाली होती. मंगळवारी दोन विमानांतून 39 प्रवासी गोव्यात दाखल झाले होते, बुधवारी तीन विमानातून 122 प्रवासी तर गुरूवारी चार विमानातून 96 प्रवासी दाखल झाले.
काल शुक्रवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास इंडिगो एअरलाईन्सचे विमान 34 प्रवाशांसह बेंगळूरहून दाबोळी विमानतळावर दाखल झाले. याच विमानातून 48 प्रवाशांनी बेंगळूरला प्रयाण केले. दुपारी 2.20 वा. दिल्लीहून इंडिगो एअरलाईन्सचे विमान 43 प्रवाशांसह दाखल झाले. हेच विमान 133 प्रवाशांसह दिल्लीकडे मार्गस्थ झाले. त्यानंतर सायंकाळी 6.20 वा. बेंगळूरहून एअर एशियाचे विमान केवळ 10 प्रवाशांसह दाखल झाले. याच विमानातून 64 प्रवाशांनी बेंगळूरला प्रयाण केले. त्यामुळे पाचव्या दिवशी एकूण 87 प्रवासी गोव्यात हवाईमार्गे दाखल झाले.









