उदय सावंत/वाळपई
गोवा कर्नाटक दरम्यानच्या चोर्ला घाट रस्त्याची झालेली वाताहातसंदर्भातील वृत्त ‘तरुण भारत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर सार्वजनिक रस्ता विभागाची यंत्रणा खडबडून जागी झालेली आहे. मंगळवारपासून जास्त कामगारांची नियुक्ती करुन या चोर्ला घाट रस्त्याच्या दुरुस्ती कामाला गती देण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक रस्ता विभागाच्या वाळपई कार्यालयाच्या अधिकाऱयांकडून प्राप्त झालेली आहे. सध्या तरी 40 टक्के दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून 15 डिसेंबरपर्यंत या संपूर्ण रस्त्यावर हॉटमिक्सचा एक थर घालण्यात येणार आहे. यामुळे 15 डिसेंबर नंतर प्रवासी वर्गाला या रस्त्यावरून समाधानकारकपद्धतीने प्रवास करता येईल, असा दावा अधिकारीवर्गाने केलेला आहे.
गेल्या चार महिन्यांपासून चोर्ला घाट रस्त्याची डागडुजी हाती घ्यावी, अशी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडल्यामुळे प्रवासीवर्गाला आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यासंदर्भाचे वृत्त ‘तरुण भारत’ने सविस्तररित्या रविवारी प्रसिद्ध केले होते. यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याची यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. यामुळे मंगळवारपासून दुरुस्तीच्या कामाला आणखीन गती देण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱयाकडून प्राप्त झालेले आहे. गेल्या आठ दिवसांपासून या रस्त्याची डागडुजी सुरू करण्यात आलेली आहे. या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडलेले असल्यामुळे डागडुजीच्या कामाला वेळ लागत आहे. तरीसुद्धा संबंधित कंत्राटदाराकडून जास्त कामगारांची नियुक्ती करण्यात आली असून मंगळवारपासून केरी गावातील रस्त्याच्या डागडुजीला प्रारंभ करण्यात येईल, अशी माहिती रस्ता विभाग अधिकाऱयाकडून प्राप्त झालेली आहे.
डिसेंबर 15 पर्यंत हॉटमिक्स एक थर घालणार
या रस्त्याच्या पूर्ण हॉटमिक्सचे काम सरकारने मंजूर केलेले आहे. राष्ट्रीय निधीच्या माध्यमातून या रस्त्याच्या निविदेला मंजुरी प्राप्त झाली होती. पुणे महाराष्ट्र येथील एका कंत्राटदाराला हे काम मिळालेले आहे. त्याला रस्त्याची डागडुजी लवकर करण्याची विनंती करूनही त्याने संथ गतीने काम सुरु केले होते. यामुळे रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाल्याचे अधिकाऱयांनी मान्य केले. मात्र या डागडुजीला गती देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे अधिकाऱयांनी स्पष्ट केले. 15 डिसेंबरपर्यंत हॉटमिक्स एक थर संपूर्ण रस्त्यावर घालण्यात येईल जेणेकरून रस्ता वाहतुकीसाठी समाधानकारक होणार असल्याचा दावा अधिकारीवर्गाने केलेला आहे.
मंगळवारपासून केरी गावातील दुरुस्ती करणार
गोवा कर्नाटक हद्दिपासून रस्त्याच्या डागडुजीला सुरुवात करण्यात आली असली तरीसुद्धा सकाळी कामगार सदर ठिकाणी पोहोचण्यासाठी बराच उशीर लागतो. यामुळे आता केरी गावातून डागडुजीला प्रारंभ करण्याच्यादृष्टीने आणखीन कामगारांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मंगळवारपासून या कामाला प्रारंभ होणार असल्याचे या अधिकाऱयाने स्पष्ट केले आहे.
अवजड वाहनांची मोठी डोकेदुखी
जिल्हाधिकाऱयांनी या भागातून अवजड वाहतुकीला पूर्णपणे बंदी घातलेली आहे मात्र जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत अवजड वाहतूक या भागातून होऊ लागली आहे. याचा प्रतिकूल परिणाम डागडुजीच्या कामावर होत असून मोठे वाहन आल्यावर थोडय़ा काळासाठी काम बंद करावे लागते. पोलिसांनी याकडे लक्ष देऊन अवजड वाहतुकीवर नियंत्रण आणण्याची मागणी करण्यात आली आहे.