प्रतिनिधी / मडगाव
उपमुख्यमंत्री व कृषीमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांनी दोन दिवसांपूर्वीच म्हटल्या प्रमाणे, गोवा बागायतदार खरेदी विक्री संस्थेने काल गुरुवार दि. 9 रोजी काजूचा दर हा रु. 105 प्रती किलो ठरवला आहे. ज्यामुळे काजू बिया खरेदी करण्यास सुरुवात संस्थेतर्फे झालेली आहे.
काजू बियांच्या ऐन हंगामात कोरोना व्हायरसमुळे राज्यात संचारबंदी लागू झाली. त्यामुळे काजू उत्पादक शेतकरी, काजू बियांची विक्री करू शकले नव्हते. कृषीमंत्री चंद्रकांत कवळेकर बागायतदार संस्थेशी बोलणी केल्यानंतर संस्थेने दर ठरविला आणि आजपासून काजू बियां खरेदी करण्यास बागतदार संस्थेने सुरुवात केली आहे. यामुळे काजू उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कृषी खाते सध्याच्या संचार बंदीच्या काळात कृषीसंबंधी सर्व बाबींवर लक्ष ठेऊन आहे. जेणेकरून शेतकरीवर्गाला या संचारबंदीची कमीतकमी झळ पोहोचेल असे कृषीमंत्री श्री. कवळेकर यांनी म्हटले आहे.
दर ठरविण्यासाठी सरकारी यंत्रणा नाही
दरम्यान, राज्यात काजूचा दर कोणी ठरवावा या मुद्दावरून वाद झाला होता. माजी कृषीमंत्री रमेश तवडकर यांनी काजूचा दर गोवा कृषी पणन मंडळाने ठरवावा, अशी मागणी केली होती. पण, काल गोवा बागायतदार संस्थेने जो दर ठरविला, तोच दर इतर संस्थांनी उचलून धरला. गोवा बागायतदार संस्था ही शेतकऱयांची संस्था आहे. आजपर्यंत या संस्थेने गोव्यातील शेतकऱयांचे हित जपले आहे.
शेती मालाचा दर ठरविण्यासाठी गोव्यात सरकारी यंत्रणा नाही का ? असा सवाल आत्ता उपस्थित झाला आहे. गोव्यातील शेती मालाचा दर ठरविण्यासाठी वेळीच उपाय योजना आखावी लागणार आहे. अन्यथा शेती मालाचा दर ठरविण्याच्या मुद्दावरून पुन्हा वाद होण्याची शक्यता अधिक आहे. त्याच बरोबर एका संस्थेने दर ठरविल्यास, त्याच संस्थेला जबाबदार धरले जाण्याची शक्यता देखील नाकारली जात नाही.