जनतेने कल्पना, सूचना, आक्षेप मांडण्याचे आवाहन
प्रतिनिधी/ पणजी
मुख्यमंत्री कार्यालयातर्फे ‘गोवा बजेट – 2020/21’ हे वेब पोर्टल सुरु करण्यात आले असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्याचा पर्वरी येथील विधानसभा संकुलातील आपल्या दालनात कळ दाबून शुभारंभ केला. त्या पोर्टलवर जनतेने अर्थसंकल्पाविषयी कल्पना, संकल्पना, सूचना, आक्षेप असे सर्व काही पाठवावे, अशी विनंती डॉ. सावंत यांनी केली आहे.
अर्थसंकल्पात जनतेचा सहभाग असावा, त्यात पारदर्शकता यावी, त्याचे योग्य ते नियोजन व्हावे या उद्देशाने हे वेब पोर्टल सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे सरकार लोकाभिमूख अर्थसंकल्प मांडू शकेल असे मत डॉ. सावंत यांनी प्रकट केले. 31 जानेवारी 2020 रोजी सायं. 6 वा.पर्यंत त्या पोर्टलवर अर्थसंकल्पाबाबत सूचना नोदंवता येतील व सरकारतर्फे त्याची दैनंदिन पातळीवर नोंद घेतली जाणार असल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली.
या वेब पोर्टलवर जाण्यासाठी प्रथम www.goaonline.gov.in येथे नोंदणी करावी आणि सर्व तपशील देऊन ओटीपीची खात्री करावी नंतर गोवा बजेट 20-21 वर कळ दावून पोर्टलवर जावे, अशी सूचना करण्यात आली आहे. गोव्याचे अर्थसंकल्पाच्या माध्यमातून भवितव्य घडवण्यासाठी सर्वांनी या पोर्टलवर योगदान द्यावे असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले आहे.
प्रशासन, कृषी, नागरी पुरवठा, शिक्षण, आरोग्य, गृहनिर्माण, उद्योग, साधनसुविधा, न्याय, खाणी, वीज, समाजव्यवस्था, क्रीडा, महिला – बालविकास, पर्यटन, वाहतूक, माहिती – प्रसिद्धी, कामगार – रोजगार, पंचायत राज, सार्वजनिक बांधकाम खाते, वन – पर्यावरण, मासेमारी – नदी परिवहन अशा विविध क्षेत्रातील जाणकारांनी अर्थसंकल्पावरील सूचना पोर्टलवर ऑनलाईन सादर कराव्यात. त्यांचा अर्थसंकल्प तयार करताना विचार होईल, असेही डॉ. सावंत म्हणाले.









