विविध क्षेत्रांतील तज्ञांचा समावेश राहणार ः अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी दिलेली माहिती
प्रतिनिधी / मडगाव
कोरोना विषाणूच्या विषयावर राज्य सरकारची आत्मघातकी धोरणे तपासून पाहण्यासाठी गोवा फॉरवर्ड पक्षाने आता विविध क्षेत्रांतील तज्ञांची एक ‘कोव्हिड थिंक टॅंक’ बनविण्याचे ठरविले असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष असलेले फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी दिली आहे.
कोव्हिड-19 च्या साथीशी झुंजण्यासाठी गोवा सरकार जी उपाययोजना करत आहे ती पाहून गोवा फॉरवर्ड पक्षाला तीव्र चिंता होत आहे. या सरकारचे निर्णय बघितल्यास सरकार गोंधळून गेले आहे हे स्पष्टपणे दिसून येते. येथे एका हाताने घेतलेला निर्णय दुसऱया हाताला कळत नाही. त्यामुळे एक तर आत्मघातकी निर्णय घेतले जातात किंवा घेतलेले निर्णय निरर्थक असतात, अशी टीका सरदेसाई यांनी केली आहे.
सर्वेक्षण नेमके कशासाठी ?
सर्वांत प्रथम म्हणजे शिक्षक, बीएलओ यांना वापरून घरोघरी केले जाणारे सर्वेक्षण नेमके कशासाठी आहे. यामुळे या साथीचा फैलाव संपणार की, तो वाढावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिकेतून गोव्यात आलेल्या त्या 38 वर्षीय रुग्णाचे गोमेकॉत नेमका कुठल्या कारणामुळे निधन झाले. याबाबतीत सरकार माहिती लपवून तर ठेवत नाही ना. दुर्दैवाने जर उर्वरित भारत आणि गोवा फैलावाच्या तिसऱया टप्प्यात पोहोचला, तर त्यावेळी निर्माण होणार असलेल्या परिस्थितीशी दोन हात करण्यास गोवा प्रशासन सज्ज आहे का, असे प्रश्न सरदेसाई यांनी उपस्थित केले आहेत.
समुद्रात अडकलेल्या गोमंतकीय खलाशांना परत आणण्याचा प्रश्न टाईम बॉम्बसारखा टिकटिकत आहे. आतापर्यंत सरकारकडून याबाबतीत फक्त पोकळ आश्वासने मिळालेली आहेत. या पार्श्वभूमीवर गोवा फॉरवर्ड पक्षाला थिंक टँक स्थापना करावासा वाटला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
कोव्हिड-19 साथीची राज्यातील व्याप्ती पाहून व गोव्याची सामाजिक, राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक परिस्थिती लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घेण्यास मदत करणे, ही साथ आटोक्यात आणण्यासाठी ‘प्रतिबंध, रोखणे व उपचार’ याबाबतीत सरकारी उपाययोजना योग्य आहेत की नाही यावर नजर ठेवणे आणि त्या योग्य नसल्यास सरकारला उघडे पाडणे, ही साथ रोखण्यासाठी जगात कुठल्या उपाययोजना राबविल्या जात आहेत आणि त्यानुसार गोव्यातील वातावरण पाहून तशा येथे राबविता येतात का हे पाहणे, हे या थिंक टँकच्या स्थापनेमागचे हेतू आहेत, असे सरदेसाई यानी म्हटले आहे. दुर्दैवाने सरकारची धोरणे पहिल्यास गोमंतकीय स्वतःच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी या सरकारवर विसंबून राहू शकत नाहीत या निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.









