प्रतिनिधी / मडगाव
गोवा प्रदेश काँग्रेस समिती तर्फे, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ट नेते व माजी आमदार जितेंद्र देशप्रभू यांना दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस पक्ष कार्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, काँग्रेस विधीमंडळ गट नेते दिगंबर कामत, पक्षाचे राष्ट्रिय सरचिटणीस लुईझिन फालेरो, दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष ज्यो डायस, राज्य उपाध्यक्ष एम. के. शेख, सरचिटणीस सुभाष फळदेसाई, मडगाव गट अध्यक्ष गोपाळ नाईक उपस्थित होते.
सर्व नेत्यांनी स्व. जितेंद्र देशप्रभूच्या तसबिरीला पुष्प अर्पण करुन श्रद्धांदली वाहिली.
यावेळी बोलताना प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी जितेंद्र देशप्रभूच्या निधनाने काँग्रेस पक्ष एका प्रामाणिक व सच्चा नेत्यास मुकला असे सांगून त्यांच्या स्मृतिस आदरांजली वाहिली.
विधीमंडळ गट नेते दिगंबर कामत यांनी दिवंगत जितेंद्र देशप्रभू व त्यांच्या संपूर्ण कुटूंबाचे काँग्रेस पक्षासाठी खुप मोठे योगदान असल्याचे सांगून, कोरोनाच्या संकटामुळे सरकारने जारी केलेल्या निर्बंधामुळे आज त्यांच्या अंत्यसंस्कारास काँग्रेसचे आमदार व पदाधिकारी उपस्थित राहु शकले नाहीत असे म्हटले. जितेंद्र देशप्रभूंच्या स्मृति नेहमीच काँग्रेस पक्ष जपेल असे ते म्हणाले.
अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस व आमदार लुईझिन फालेरो यांनी यावेळी बोलताना देशप्रभू हे तडफदार व सडेतोड व्यक्तिमत्व होते असे सांगून, त्यांच्या निधनाने पक्षाचे खुप मोठे नुकसान झाल्याचे सांगितले.
यावेळी एम. के. शेख, ज्यो डायस तसेच सुभाष फळदेसाई यांची स्व. जितेंद्र देशप्रभूना आदरांजली वाहणारी भाषणे झाली.
श्रद्धांजली कार्यक्रमाच्या वेळी सामाजिक अंतर ठेवण्याची पुर्ण खबरदारी घेण्यात आली होती.









