प्रतिनिधी/ फोंडा
गोवा डेअरीने गायीच्या दुधावर 75 पैशांनी दिलेली दरवाढ शेतकऱय़ांना अमान्य असून ती त्वरीत रद्द करावी. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 2 मार्च रोजी पशुखाद्य दरवाढीवर तोडग्यासंबंधी झालेल्या निर्णयानुसार डेअरीने शेतकऱय़ाकडून दुध खरेदी करताना प्रति लिटर रू 3 प्रमाणे दरवाढ द्यावी. त्य़ानुसार एप्रिल 2020 पासून सर्व शेतकऱयांना सदर दरवाढ लागू करावी अशी जोरदार मागणी शेतकऱयांनी काल रविवारी फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केली आहे.
यावेळी दुध उत्पादक प्रमोद सिद्धये, वैभव परब, संजीव कुंकळकर, अनुप देसाई, विश्वास सुंखटणकर व नितीन प्रभूगावकर उपस्थित होते. शेतकऱयांनी गोवा डेअरीकडे दुधदरवाढीसाठी कोणतीच मागणी केली नव्हती. फक्त गोवा डेअरीने पशुखाद्यात केलेले भरघोस वाढ कमी करावी अशी मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानुसार सुवर्णमध्य काढताना पशुखाद्याऐवजी शेतकऱय़ाना दुध खरेदीत दरात रू. 3 प्रति लिटर देण्याचे निर्णय झाला होता. फॅट 3.5 व एसएनएफ 8.0 दुधावर शेतकऱयांना प्रति लिटर रू. 3 अशी दरवाढ देण्याचा सुवर्णमध्य़ काढण्यात आला होता. त्रिसदस्यीय समितीने त्यावर अंमलबजावणी न करता केवळ 75 पैसे-1 रूपयाची दरवाढ करून संपुर्ण शेतकऱयांचे अहित साधल्याचा आरोप शेतकऱयांनी यावेळी केला.
डेअरी आधीच खोगिरभरतीने त्रस्त तरी नोकरभरती सुसाट
सद्यपरिस्थितीत डेअरीची धुरा सांभाळणाऱया त्रिसदस्यीय समितीने फुकटचे शेय घेण्याचे प्रकार सुरू आहेत. ई-टेंडरिंग पद्धती प्रशासक दामोदर मोरजकर यांच्या कार्यकाळापासून सुरू असल्याचे सुचित केले आहे. दुधाची नासाडी रोखावी म्हणून प्रशासक संतोष पुंडईकर व रघुनाथ धुरी यांनी यापुर्वी प्रयत्न केल्याची माहिती दिली. सद्यपरिस्थितीत दुधाची गळती रोखण्यासाठी क्रेट बदलून उपयोग नसून त्यासाठी प्रशासकीय कौशल्याची गरज असल्याचा सल्ला शेतकऱयांनी दिला आहे. आधीच कर्मचाऱयांच्या खोगिरभरतीने ग्रासलेल्या गोवा डेअरीमध्ये परत एकदा नोकर भरतीसाठी जाहीरात प्रसिद्ध केल्यामुळेही शेतकऱयांनी संताप व्यक्त केला आहे.
गोवा डेअरीचे उत्पादन दोन शिफ्टऐवजी एकाच शिफ्टमध्ये आणून उत्पादनातील खर्चात कपात करण्यात आल्याची आव आणणे खोटारडेपणा आहे. अधिक असलेल्या कर्मचाऱयाचे काय? त्य़ाचा बोजा डेअरीवर नाही का? कंत्राटदाराच्या दादागिरीला आवर घालणे समितीला जमलेले नसल्याचा टपका त्रिसदस्यीय समितीवर ठेवला आहे. तुटपुंजी दरवाढ देऊन गोवा डेअरीने राज्यातील शेतकऱयांना हिरमोड न करता मुख्यमंत्र्यानी दिलेल्या आश्वासनानुसार प्रति लिटर रू. 3 या दराने शेतकऱयांना दुधदरवाढ द्यावी अशी मागणी केली आहे. अन्यथा येत्या दिवसात कठोर पावले उचलली जाणार असल्याचा ईशारा शेतकऱयांनी दिला आहे.









