प्रतिनिधी/ फोंडा
माधव सहकारी व अनुप देसाई या गोवा डेअरीच्या दोघा संचालकांनी पदाचे राजीनामे दिल्याने गोवा डेअरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तीन दिवसांपूर्वी त्यांनी आपले राजीनामापत्र डेअरीच्या अध्यक्षांना सादर केले आहे. डबघाईस आलेली डेअरीची आर्थिक स्थिती, मोठ्याप्रमाणात थकलेली देणी व गेल्या सात महिन्यात त्यावर सातत्याने उपाययोजना सुचवूनही संचालक मंडळाची चाललेली बेफिकीरी यामुळे अत्यंत निराशेने हे पाऊल उचलावे लागत असल्याचे अनुप देसाई यांनी सांगितले.

माधव सहकारी यांनी आपल्या राजीनाम्यामागील कारण स्पष्टपणे सांगण्यास नकार दिला असला तरी, डेअरीच्या एकंदरीत कारभारामागे त्यांची नाराजी दिसते. डेअरीचे अध्यक्ष राजेश फळदेसाई यांच्याकडे आपण लेखी राजीनामा सादर केला असून त्यात सर्व गोष्टी स्पष्ट केल्याचे त्यांनी सांगितले. सध्या डेअरी आर्थिक आणिबाणीत सापडली आहे, एवढ्या मोघम शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
गेल्या जून महिन्यात झालेल्या निवडणुकीत माधव सहकारी व अनुप देसाई डेअरीच्या 12 सदस्यीय संचालक मंडळावर निवडून आले होते. अवघ्या सात महिन्यातच त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याने डेअरीमध्ये खळबळ माजली आहे. अनुप देसाई यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना डबघाईस आलेला डेअरीचा आर्थिक डोलारा सावरण्यासाठी आपण गेल्या सहा महिन्यापासून सातत्याने उपययोजना सूचवित आहे. मात्र संचालक मंडळाकडून दूध दरवाढी पलीकडे इतर कुठलेच ठोस निर्णय घेण्याचे गांभीर्य दाखविले गेले नाही. नवीन संचालक मंडळाने 18 जुलै 2022 रोजी ताबा घेतला होता. या सात महिन्यामध्ये डेअरीची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काही महत्त्वाची पावले उचलणे गरजेचे होते. डेअरीला डबघाईस नेण्यासाठी मुख्य कारण ठरलेला पशुखाद्य प्रकल्प काही काळासाठी बंद करावा व तो एखाद्या खासगी आस्थापनाकडे ठराविक काळासाठी कंत्राटी पद्धतीवर सुपुर्द करावा, असा आपला प्रस्ताव होता. सध्या पशुखाद्य प्रकल्पावर महिन्याकाठी ऊ. 30 ते 35 लाख तोटा सोसावा लागत आहे. डेअरीला कच्चा माल पुरविणाऱ्या कंत्राटदारांची थकीत बिले चुकती करण्यात आलेली नाहीत. मार्केटींग विभागात सुधारणा तसेच अन्य काही उपाययोजना संचालक मंडळाच्या बैठकीत मांडूनही त्याबाबत कुठलाच निर्णय घेतला जात नाही. डेअरीत सुधारणा होत नसल्यास केवळ संचालक मंडळाची खुर्ची अडवून बसण्यात अर्थ नाही. त्यामुळे राजीनामा देऊन बाहेर पडणे योग्य वाटल्याचे अनुप देसाई यांनी सांगितले.









