प्रतिनिधी/ मडगाव
सरकारचा एखाद्या कार्यक्रम असो किंवा मंत्री-आमदार यांचे वाढदिवस असो त्या ठिकाणी गोवा डेअरीचे ‘फ्लेवरड् मिल्क’ हमखास मिळत असे. पण, या पुढे गोवा डेअरीचे फ्लेवरड् मिल्क कुणालाही फुकटात दिले जाणार नाही अशी माहिती गोवा डेअरीचे चेअरमन दुर्गेश शिरोडकर यांनी दिली आहे. याला फक्त अपवाद असेल तो गोवा डेअरीला दूध पुरवठा करणाऱया सोसायटय़ा. दूध पुरवठा करणाऱया सोसायटय़ांना वर्षातून 200 पाकिटे फ्लेवरड् मिल्क मोफत दिले जाणार आहे.
फ्लेवरड् मिल्क फुकटात दिल्याने गोवा डेअरीला दर वर्षी बराच आर्थिक फटका बसायचा. खास करून राजकारण्याची मर्जी सांभाळण्यासाठी या पूर्वी सरकारी कार्यक्रम तसेच मंत्री-आमदारांच्या वाढदिवसाला फुकटात फ्लेवरड् मिल्क पुरविले जायचे. पण, या पुढे असे प्रकार होणार नाही याची दक्षता घेतली जाईल अशी माहिती श्री. शिरोडकर यांनी दिली.
फुकटात फ्लेवरड् मिल्कसाठी कुणीही मागणी करू नये. जर कुणाला फ्लेवरड् मिल्क हवे असेल तर त्यांची योग्य ती किमंत मोजूनच ते खरेदी करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. गोवा डेअरीचा कारभार पुन्हा रूळांवर आणण्यासाठी आपल्याला डेअरीचे कर्मचारी तसेच गोव्यातील तमाम दूध उत्पादक शेतकरी यांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे ही त्यांनी सांगितले. हल्लीच दूध उत्पादक शेतकऱयांना दर वाढ देण्यात आलेली आहे. मात्र, काही दूध उत्पादक शेतकरी आणखीन दर वाढ द्यावी अशी मागणी करतात ती सद्या तरी शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी पोचले तपासणीसाठी
भाजपचे सरचिटणीस तथा फातेर्डाचे माजी आमदार दामू नाईक यांचा हल्लीच वाढदिवस साजरा झाला. दुर्गेश व दामू नाईक एकमेकांचे शेजारी तसेच समर्थक, त्यामुळे दामूच्या वाढदिवसाला गोवा डेअरीचे फ्लेवरड् मिल्क नक्कीच पोचणार असल्याचा संशय काही प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना होता. त्यामुळे हे प्रतिनिधीन सुमारे पंचेचाळीस मिनिटांचा प्रवास करून फातोडर्य़ात पोचले खरे, परंतु, या वाढदिवसात गोवा डेअरीचे फ्लेवरड् मिल्क त्यांना सापडू शकले नाही. या पूर्वी दामू नाईक यांना शुभेच्या देण्यासाठी हे प्रतिनिधी यापूर्वी कधी फातोडर्य़ात आले नव्हते. पहिल्यादाच आले ते दुर्गेशला घेरण्यासाठी मात्र, त्यांचा हा प्रयत्न फोल ठरला.
83 लाखांचे दूध तपासणी यंत्र
गोव्यातील जनतेला उच्च दर्जाचे दूध मिळावे यासाठी गोवा डेअरी सातत्याने प्रयत्न करीत आली आहे. त्यात कोणतीच तडजोड केली जाणार नाही. दूधाचा दर्जा चांगला रहावा यासाठी दूध तपासणी यंत्र आणले आहे. हे दूध तपासणी यंत्र सरकारने पुरविले असून त्यांची किंमत सुमारे 83 लाख रूपयांची असल्याची माहिती श्री. शिरोडकर यांनी दिली. या यंत्राच्या खरेदीवर गोवा डेअरीने एकही पैसा खर्च केलेला नाही.
या यंत्राद्वारे गोवा डेअरीत येणाऱया दूधाची तपासणी केली जाईल. साहजिकच दूधात भेसळ करण्याचे प्रकार देखील आपसुख बंद होतील. त्यामुळे ग्राहकांना उच्च दर्जाचे दूध पुरविणे शक्य होईल अशी माहिती त्यांनी दिली.









