दुधावर 1 रुपये दरवाढ : 1 सप्टेंबरपासून मिळणार वाढीव रक्कम
प्रतिनिधी / फोंडा
गोवा डेअरीने गायीच्या दुधावर शेतकऱयांना साधारण एक रुपया दरवाढ जाहीर केली असून येत्या 1 सप्टेंबरपासून ही दरवाढ लागू होणार आहे. 5.5 टक्के व त्याहून अधिक फॅट असलेल्या दुधावर प्रतिलिटर मागे ही दरवाढ शेतकऱयांना मिळणार आहे. शिवाय 3.5 टक्क्यापर्यंत फॅट असलेल्या दुधावर 75 पैसे दरवाढ मिळेल. गोवा डेअरीच्या सरकार नियुक्त त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष दुर्गेश शिरोडकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ही दरवाढ देऊन गोवा डेअरीने राज्यातील साधारण 4 हजार शेतकऱयांना गणेश चतुर्थीची भेट दिलेली आहे.
गोवा डेअरीला दूध पुरवठा करणाऱया राज्यातील शेतकऱयांना यापूर्वी 5.5 टक्के फॅट असलेल्या गायीच्या दुधावर 34 रुपये 95 पैसे प्रति लिटरमागे मिळत होते. वाढीव दरानुसार 35 रुपये 89 पैसे मिळणार आहेत. 3.5 टक्के फॅट असलेल्या दुधावर यापूर्वी 28 रुपये 14 पैसे दर मिळत होता, तो आता 30 रुपये मिळणार आहे. याशिवाय सरकारकडून या दरावर 40 टक्के आधारभूत किंमत मिळणार आहे. शेतकऱयांना दूध दरवाढ देताना ग्राहकांवर त्याचा कुठलाच भार पडणार नाही. बाजारातील दूध दरात कुठलीच वाढ होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिल फडते व साहाय्यक निबंधक अवित नाईक हे उपस्थित होते.
कोरोनामुळे 20 हजार लिटर पुरवठा घटला
सध्या गोवा डेअरीचा बाजारातील दूध पुरवठा प्रतिदिनी 66 हजार लिटर एवढा असून दूध संकलन 50 हजार 575 लिटर एवढे होत असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना महामारीमुळे सध्या बरीच हॉटेल्स व शाळा बंद असल्याने 20 हजार लिटर दूध विक्रीत घट आली आहे. त्यापैकी साधारण 3 हजार लिटर दूध शाळांना पुरविले जात होते. विक्रीत घट झाली तरी गोवा डेअरी सध्या नफ्यात असल्याचे शिरोडकर यांनी सांगितले.
खर्च कपात व उत्पादन वाढीवर भर
गोवा डेअरीचा त्रिसदस्यीय समितीकडे ताबा आल्यानंतर गेल्या तीन महिन्यात डेअरीच्या विविध विभागामध्ये मोठय़ा प्रमाणात खर्च कपात करून तोटा भरून काढण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली गेली आहेत. त्यात अपेक्षित यश आल्याचे दुर्गेश शिरोडकर यांनी सांगितले. गेल्या बऱयाच वर्षांपासून गोवा डेअरीचे उत्पादन दोन पाळय़ांमध्ये चालायचे ते एकाच पाळीमध्ये आणून उत्पादनातील खर्चात कपात केली आहे. कामगारांच्या ओव्हरटाईमचा खर्चही त्यामुळे कमी झाला. दूध पुरवठा करताना गळती लागलेली पाकिटे विक्रेत्यांकडून परत केली जायची. त्यावर उपाय म्हणून चांगल्या प्रतीच्या क्रेट्स खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले. डेअरीच्या विविध व्यवहारांमध्ये पारदर्शकता येण्यासाठी ई टेंडर प्रक्रिया काटेकोरपणे अंमलात आणली गेली आहे. गोवा डेअरीची काही जुनी वाहने जी भंगारात काढली होती, त्यांची दुरुस्ती करून ती पशुखाद्य व इतर वाहतुकीसाठी पुन्हा वापरात आणल्याने कंत्राटीपद्धतीवर चालणाऱया वाहनांमध्ये कपात करण्यात आली आहे.
प्रशासकांनी रचला पाया….
स्थानिक दूध संस्थांचे अध्यक्ष तसेच अन्य दूध शेतकऱयांच्या विविध समस्या जाणून घेत त्यावर तातडीने तोडगा काढण्याची कृती गेल्या दोन महिन्यात डेअरी व्यवस्थापनाने सुरु केली आहे. यापूर्वी गोवा डेअरीचे अनेक कर्मचारी व अधिकारी त्यांचे अनुभवकौशल्य सोडून इतर विभागात काम करायचे. त्यात बदल करून त्यांच्या कौशल्यानुसार त्या त्या विभागात त्यांना पुन्हा रुजू करण्यात आले आहे. पशुखाद्यावरील प्रक्रिया पूर्वी डेअरीचे अभियंते किंवा कॅमिस्टकडून व्हायची. त्यात बदल करुन ते काम पोषक आहार तज्ञाकडे दिलेले आहे. ज्यामुळे गुरांना चांगले खाद्य तर मिळेलच, शिवाय शेतकऱयांना खाद्याविषयी योग्य मार्गदर्शन मिळण्यास मदत होणार आहे. ग्राहकांना ताजे व दर्जेदार दूध मिळावे यासाठी दूध खरेदी करताना ते भेसळमुक्त असणे आवश्यक आहे. त्यासाठी बल्क मिल्क कुलरमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. गोवा डेअरीच्या वाहनांचा खासगी कामासाठी होणाऱया वापरावर पूर्णपणे नियंत्रण आणले आहे, अशी माहिती शिरोडकर यांनी दिली. गोवा डेअरीमध्ये सध्या ज्या नवीन सुधारणा व खर्च कपातीची पावले उलचली गेली, त्याची सुरुवात प्रशासक अरविंद खुटकर यांनी केली होती. 1 जून पासून नियुक्त करण्यात आलेल्या त्रिसदस्यी समितीने हेच धोरण पुढे नेत डेअरीच्या कारभारात बऱयाच सुधारणा घडवून आणलेल्या आहेत, असे शिरोडकर यांनी सांगितले.
तुपाच्या उत्पादनाची मागणी वाढली गोवा डेअरीने दूध पुरवठय़ाबरोबरच इतर उत्पादनाच्या वाढीवरही विशेष भर दिलेला आहे. तुपाच्या उत्पादनाला बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात मागणी वाढली असून दर दिवशी किमान 500 किलो तुप बाजारात विकले जात आहेत. येणाऱया काळात डेअरीचा आईस्क्रीम प्रकल्पही पुन्हा सुरु करण्याचा विचार आहे. हंगामातील मागणी व मार्केटींगचा अभ्यास करून त्यासंबंधी निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.