गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, इतर पक्षांसोबत युतीवर चर्चा : पुढील चार दिवसात निर्णय देण्याची शक्यता
प्रतिनिधी / पणजी
काँग्रेस पक्षात सारे काही आलबेल आहे असे दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. गोव्यातून दिल्लीत गेलेल्या काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी पक्षाचे गोवा डेस्क इन्चार्ज दिनेश गुंडू राव यांच्यासह पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या बरोबर स्वतंत्रपणे चर्चा केली. प्रदेशाध्यक्षबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. दुसऱया पक्षाबरोबर आघाडी करण्याबाबतही निर्णय झालेला नाही मात्र राहुल गांधी गोव्याच्याबाबत पुढील चार दिवसांत निर्णय घेण्याची शक्यता आहे.
नवी दिल्लीला गेलेले काँग्रेस विधीमंडळ नेते व विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो, ऍड. रमाकांत खलप, खासदार फ्रान्सिस्क सार्दिन, आमदार आलेक्स रेजिनाल्ड इत्यादींनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबरोबर प्रत्येकाने स्वतंत्रपणे चर्चा केली. गांधी यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर सर्वांबरोबर एकत्रित छायाचित्रही घेण्यात आले. दिगंबर कामत यांच्याशी संपर्क केला असता आगामी निवडणूक नजरेसमोर ठेवून गोव्यात काँग्रेस एकसंघ राहुन सत्ताधारी भाजप विरोधात एकत्रित लढा देईल. आपसातील मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र, यावे असे आवाहन राहुल गांधी यांनी केले आहे.
अनेक महिन्यानंतर नवी दिल्लीला गेलेले दिगंबर कामत आपल्या मित्रमंडळींना भेटून उद्या गोव्यात परतणार आहेत. सार्दिन यांनी गिरीश चोडणकर यांना हटविण्याची मागणी पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्याकडे केली आहे. प्रत्येक नेत्याने वैयक्तिक चर्चा करुन आपली कैफियतही मांडलेली आहे. चर्चा यशस्वी झालेली आहे असे दिगंबर कामत यांचे म्हणणे आहे, मात्र चर्चेतून काय निष्पन्न झाले हे समजलेले नाही.
राहुल गांधी हे गोव्याच्या बाबतीत अंतिम निर्णय पुढील दोन दिवसांत घेतील असा अंदाज आहे. त्यानुसार प्रदेशाध्यक्षपद हे कदाचित ऍड. रमाकांत खलप यांच्याकडे जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मात्र त्याची घोषणा ही नवी दिल्लीतून करण्यात येणार आहे. गोवा फॉरवर्ड व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करण्याबाबत चर्चा झालेली नसली तरी त्यावरील निर्णयही पक्ष लवकरच घेणार आहे.









