पक्षाध्यक्षपदी अमित पाटकर तर विरोधी पक्षनेतेपदी मायकल लोबोंची निवड
प्रतिनिधी /पणजी
काँग्रेसची धुरा आणि मदार आता युवा नेतृत्वाकडे सोपविण्यात आली असून काँग्रेस पक्ष यापुढे गोमंतकीय जनतेचा बुलंद आवाज बनणार असल्याचा दावा विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी केला आहे.
गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी अमित पाटकर तर विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस विधीमंडळ गटनेतेपद लोबो यांना देण्यात आले आहे. आमदार दिगंबर कामत यांना काँग्रेसच्या कार्यकारी समितीत स्थान मिळाले असून तरुण रक्ताला वाव देण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाने केला आहे.
गोव्यातील काँग्रेसच्या पराभवाची दखल
त्याच त्याच पदावर पुन्हा तेच तेच नेते राहत असल्यामुळे नवीन उमेदवारांना संधी देण्याची मागणी असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांकडून केली जात होती. त्या मागणीची दखल पक्षश्रेष्ठींनी घेऊन अखेर प्रदेश काँग्रेस समितीत परिवर्तन घडवले आहे. गोव्यातील काँग्रेसच्या नामुष्कीजनक पराभवाची दखल घेऊन काही जणांना पदावरुन हटविण्यात आले असून तेथे नवीन उमेदवारांना स्थान देण्यात आले आहे.
अन्य पदांवरही युवकांचीच नियुक्ती
कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमांव यांना कार्यकारी अध्यक्षपदी नेमण्यात आले आहे. विरोधी पक्ष उपनेतेपदी मुरगांवचे आमदार संकल्प आमोणकर यांना विराजमान करण्यात आले आहे. उत्तर गोवा काँग्रेस अध्यक्षपदी विरेन शिरोडकर तर दक्षिण गोवा अध्यक्षपदी सावियो डिसिल्वा यांना जबाबदारी देण्यात आली आहे. हे सर्व नेमण्यात आलेले उमेदवार तरुण असून गोवा राज्यातील काँग्रेस पक्षाची चावी युवा नेतृत्वाच्या हाती देण्यात आली आहे.
जनतेच्या हितासाठी लढणार असल्याची ग्वाही पाटकर व लोबो यांनी दिली असून पक्षाला पुन्हा नवचैतन्य मिळवून देण्याचे इरादे त्यांनी स्पष्ट केले आहेत. हळदोण्याचे आमदार कार्लुस फरेरा यांना पक्षाचे मुख्य ‘व्हिप’ करण्यात आले असून काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सर्वांनी म्हटले आहे.









