ऑनलाईन टीम / पणजी
गोवा विधानसभेच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभांना आता वेग आला असून प्रचार सुरु असतानाच विरोधी पक्षांवर ही टीकास्त्र सोडले जात आहे. आज भाजपने पणजी येथे पत्रकार परिषद घेत गोवा काँग्रेसने काल आपल्या उमेदवारांसह घेतलेल्या शपथेवरुन काँग्रेसवर निशाणा साधला. यावेळी भाजपचे गोवा प्रदेश अध्यक्ष सदानंद तानवडे यांनी गोवा काँग्रेसचा आपल्याच उमेदवारांवर विश्वास नसेल तर मतदारांनी का ठेवावा ? असा प्रश्न करत गोवा काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
गोव्यात काँग्रेसने नेमके काय केलं ?
काँग्रेसच्या ३६ उमेदवारांनी शनिवार दि. २२ जानेवारी रोजी महालक्ष्मी मंदिर, बांबोळी येथील खुरीस आणि बेती येथील हजरत मोहम्मद हमजाशाह दर्गा येथे जाऊन शपथ घेतली. ही शपथ त्यांनी पक्षांतर करणार नाहीत आणि गोव्याच्या हितासाठी एकजुटीने काम करणार यासाठी घेतली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि निवडणूक रणनीतीकार पी चिदंबरम, गोव्याचे प्रभारी दिनेश गुंडू राव, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, जीपीसीसीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर आणि काँग्रेसचे इतर नेते सर्व ३६ उमेदवारांसह यावेळी उपस्थित होते.
हेच निमीत्त साधत भाजपचे गोवा प्रदेश अध्यक्ष सदानंद तानवडे यांनी या पत्रकार परीषदेत गोवा काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते या वेळी म्हणाले कि आज पर्यंत काँगेसने भाजपने धर्माचे लेबल लावत टीका केली आहे. मात्र आज हे काँग्रेस वेगवेगळ्या मंदिर, मस्जिद, चर्चमध्ये जात उमेदवारांकडून शपथ घेत आहे. त्यामुळे यातुन काँग्रेसचा ढोंगीपणा स्पष्ट होतो. असे ही ते यावेळी म्हणाले. यावेळी महाराष्ट्राचे भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये, भाजप नेत्या चित्रा वाघ आदि भाजप नेते यावेळी उपस्थित होते.