कारवार तालुकावासियांमध्ये समाधान
प्रतिनिधी/ कारवार
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कारवार अंकोलाच्या आमदार रुपाली नाईक यांना दिलेल्या आश्वासनाची पुर्तता केली आणि आज मंगळवारपासून गोवा-कर्नाटक दरम्यानच्या आंतरराज्य वाहतूकीला सुरुवात झाली. परिणामी कारवार जिल्हावासियांच्याकडून विशेष करून कारवार तालुकावासियांच्याकडून समाधान व्यक्त केले जात आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर 24 मार्चपासून गोवा आणि कर्नाटक दरम्यानच्या वाहतुकीवर कडक निर्बंध लादण्यात आले होते. परिणामी गोवा आणि कारवार जिल्हावासियांदरम्यानचे सर्व व्यवहार ठप्प होऊन याचा फार मोठा फटका कारवार तालुकावासियांना बसला होता. अलीकडेच केंद्र सरकारने आंतरराज्य वाहतुकीवरील निर्बंध हटविण्याच्या सूचना राज्य सरकारना दिल्या होत्या. तथापि गोवा सरकारने मात्र आंतरराज्य वाहतुकीवरील निर्बंध हटविले नव्हते. परिणामी गोवा सरकारच्या विरोधात कारवार तालुक्यासह जिल्हय़ात आक्रोश पसरला होता. त्यामुळे येथील टॅक्सी चालक संघटनेच्या पदाधिकाऱयांनी आणि सदस्यांनी येथून जवळच्या माजाळी (पोळे) तपासणी नाक्यावर धाव घेऊन गोवा सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन छेडले होते. टॅक्सीचालक संघटनेला येथील अन्य संघटनाच्या पदाधिकाऱयांनी आणि कार्यकर्त्यांनी समर्थ दिले होते आणि गोवा सरकारने आंतरराज्य वाहतुकीवरील निर्बंध पाठीमागे घेतले नाहीत तर गोवा सरकारच्या विरोधात उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. कारवारचे माजी आमदार सतीश सैल यांनीही माजाळी (पोळे) तपासणी नाक्यावर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्थानिक आमदार रुपाली नाईक यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी संपर्क साधून दोन राज्यादरम्यानची वाहतूक पूर्ववत करण्याची मागणी केली होती. त्यावेळी सावंत यांनी 1 सप्टेंबर पासून वाहतूक सुरळीत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार मंगळवारपासून आंतरराज्य वाहतूक पूर्ववत झाली आहे. तथापि गोवा सरकारने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सामाजिक अंतर मास्कचा आणि सॅनिटायझरचा वापर काटेकोरपणे केला पाहिजे, अशा अटी घातल्या आहे. दरम्यान तब्बल सव्वापाच महिन्यांच्या कालावधीनंतर दोन राज्यादरम्यानच वाहतूक आणि दैनंदीन व्यवहार पूर्ववत झाल्याने दोन्ही राज्यातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
तब्बल सव्वापाच महिन्यानंतर गोव्यातील वृत्तपत्रे उपलब्ध
दैनिक तरुण भारतसह मराठी, इंग्रजी आणि कोंकणी डझनभर वृत्तपत्रे गोव्याहून कारवारला येत असतात. गोव्याहून प्रसिद्ध होणाऱया वृत्तपत्रांचा फार मोठा वाचक वर्ग कारवार तालुक्यात आहे. तथापि लॉकडाऊनमुळे 24 मार्चपासून गोव्यातील वृत्तपत्रे येणे बंद झाले होते. त्यामुळे वाचकांना याचा फार मोठा फटका बसला होता. परिणामी वाचकांना ई-पेपरवर समाधान मानावे लागत होते. मात्र वाचक वर्ग समाधान नव्हता. गोवा, कारवार दरम्यानच्या वाहतुकीवरील निर्बंध हटविण्यात आल्यानंतर मंगळवारी एक मराठी वृत्तपत्र येथे दाखल झाले. उद्यापासून अन्य वृत्तपत्रे येथे दाखल होतील. अशी शक्यता सदाशिवगड येथील वृत्तपत्र विक्रेते प्रसाद वाघ यांनी व्यक्त केली.









