नवी दिल्ली / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि गोव्यात 14 फेब्रुवारी रोजी होणाऱया निवडणुकीचा प्रचार शनिवारी सायंकाळपासून थंडावला. उत्तराखंडमध्ये 70, गोव्यात 40 आणि उत्तर प्रदेशमध्ये दुसऱया टप्प्यात 55 जागांसाठी मतदान होणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशातील कन्नौजमध्ये मोठय़ा प्रचारसभेला संबोधित केले. तर, उत्तराखंडमध्ये प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने प्रचारसभांचा धडाका लावला. काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी उत्तराखंडमध्ये खातिमा, हल्दवानी आणि श्रीनगरमध्ये निवडणूक प्रचारसभांना संबोधित केले. श्रीनगर मतदारसंघात काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष गणेश गोंदियाल हे निवडणूक रिंगणात असल्यामुळे तेथे अखेरच्या दिवशी प्रचारसभा घेण्यात आली. निवडणूक आयोगातर्फे मतदान प्रक्रियेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. रविवारी संबंधित निवडणूक अधिकारी मतदान सामुग्रीसह आपापल्या केंद्रांवर रवाना होणार आहेत.









