56 गाळेधारकांना नोटीस : बहुमजली इमारत उभारण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिकेचा महसूल वाढविण्यासाठी गोवावेस येथे व्यापारी संकुलाची उभारणी करून 56 गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. मात्र सदर व्यापारी संकुलाची इमारत जीर्ण झाल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम खात्याने दिला आहे. त्यामुळे गाळे रिकामी करण्याची नोटीस भाडेकरूंना जारी करण्यात आली आहे. सदर इमारत हटवून या ठिकाणी बहुमजली व्यापारी संकुलाची उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
महापालिकेच्या खुल्या जागा आणि व्यापारी संकुलांच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात महसूल मिळतो. गोवावेस येथील भव्य अशा जागेत उभारण्यात आलेल्या व्यापारी संकुलात 56 गाळे निर्माण करण्यात आले होते. तसेच संकुलासमोर पार्किंगकरिता मुबलक जागा आहे. सदर इमारत 34 वर्षांपूर्वी उभारण्यात आली आहे. इमारतीला गळती लागल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अहवालात करण्यात आला आहे. तसेच इमारत पूर्ण खराब झाली असून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सदर इमारत धोकादायक असल्याने हटविण्याचा विचार महापालिका प्रशासनाने चालविला आहे. त्याकरिता गाळेधारकांना नोटीस बजावण्यात आली असून पंधरा दिवसांत गाळे रिकामी करण्याची सूचना केली आहे
या ठिकाणी वर्षानुवर्षे व्यवसाय करून उदरनिर्वाह करणारे व्यावसायिक अडचणीत आले आहेत. सध्या या ठिकाणी 56 गाळे आणि विविध कार्यालये आहेत. विशेषतः महापालिकेचे महसूल विभागाचे कार्यालय असून 1 ते 26 वॉर्डांचे कामकाज या ठिकाणी चालते. तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभाग 1 आणि 2 चे कार्यालय, बेळगाव-वन, ईएसआय रुग्णालय आणि पायाभूत सुविधा खात्याचे कार्यालय अशी विविध कार्यालये आहेत. त्यामुळे महापालिकेच्या भूमिकेबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाच्या निर्णयाविरोधात आवाज उठविण्याचा विचार व्यावसायिकांनी चालविला आहे.
चारशेहून अधिक गाळे उपलब्ध करण्याचा प्रस्ताव सदर इमारत रिकामी करून नवीन बांधण्याचा प्रस्ताव आहे. पण महापालिकेने या प्रस्तावाची माहिती उघड केली नाही. प्रशस्त जागेत अत्याधुनिक पद्धतीचे व्यापारी संकुल उभारण्यात येणार असून चारशेहून अधिक गाळे आणि कार्यालयाची जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सध्या 2278 चौरस मीटर जागेत इमारतीचे बांधकाम केले आहे. सध्या पहिल्या मजल्यापर्यंत इमारत उभारण्यात आली होती. पण सदर इमारत हटवून बहुमजली इमारत उभारण्याचा प्रस्ताव आहे. मात्र निधीची तरतूद कोणत्या अनुदानामधून करण्यात आली आहे, याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.









