स्मार्ट सिटीच्या अर्धवट कामांमुळे अपघातांना आमंत्रण
प्रतिनिधी / बेळगाव
गोवावेस ते शहापूर कॉर्नरपर्यंतचे पथदीप मागील अनेक महिन्यांपासून बंद आहेत. याबाबत वारंवार तक्रार करूनदेखील कोणीच दखल घेण्यास तयार नाहीत. स्मार्ट सिटीअंतर्गत करण्यात येणारे रस्त्यांचे काम अर्धवट असल्याने पथदिपांअभावी रात्रीच्या वेळी अपघात होत आहेत. त्यामुळे या परिसरातील पथदीप सुरू करण्यासाठी मुहूर्त कधी लागणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरातील विविध रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम करण्यात येत आहे. एका बाजूच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून, दुसऱया बाजूचे काम सुरू आहे. परंतु या ठिकाणी मागील अनेक महिन्यांपासून पथदीप बंद असल्याने नागरिकांना अंधारातून प्रवास करावा लागत आहे.
स्मार्ट सिटीच्या अर्धवट कामामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या परिसरातील पथदीप पुन्हा सुरू करण्याची मागणी केली जात आहे.









