प्रतिनिधी / बेळगाव
बसवेश्वर चौक ते डाक बंगल्यापर्यंतच्या एका बाजूचा रस्ता मागील वर्षभरापासून बंद आहे. त्यामुळे एका बाजूच्या रस्त्यावरून वाहनांची ये-जा सुरू असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. बंद असलेल्या रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले असून सदर रस्ता वाहनधारकांसाठी कधी खुला होणार? अशी विचारणा नागरिक करत आहेत.
स्मार्ट सिटीचे काम अन् सहा महिने थांब… असे म्हणण्यात येत होते. पण गोवावेस येथील रस्ता मागील वर्षभरापासून बंद असल्याने सहा वर्षे थांबावे लागणार का? असा मुद्दा नागरिक उपस्थित करीत आहेत. बसवेश्वर चौक ते बॅ. नाथ पै चौकापर्यंतच्या रस्त्याचे काम स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात येत आहे. सदर रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. मात्र, साईडपट्टय़ांचे काम करण्यात आले नसल्याने वाहनधारकांना धोकादायक बनले आहे. बसवेश्वर चौक ते डाक बंगल्यापर्यंतच्या एका रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, दुसऱया बाजूच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण अद्यापही रखडले आहे. येथील व्यापारी संकुलासमोरील रस्ता डेनेज वाहिन्या घालण्यासाठी खोदण्यात आला होता. त्यामुळे सहा महिने रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर चरी बुजवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र, चिखलाच्या साम्राज्यामुळे पावसाळय़ात वाहने अडकण्याचे प्रकार सुरू होते. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय झाली. त्यानंतर स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सदर काम सुरू करून सहा महिने उलटले तरी हा रस्ता अद्याप बंदच ठेवण्यात आला आहे. रस्त्यावर मातीचे ढिगारे आणि खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात आला आहे. दुसऱया बाजूच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले. पण साईडपट्टी करण्यात आली नसल्याने दोन्ही बाजूने ये-जा करणाऱया वाहनांमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. लहानसहान अपघात देखील घडत आहेत. तसेच वर्षभरापासून खोदाई करून ठेवण्यात आल्याने व्यापारी संकुलातील व्यावसायिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. वर्षभरापासून रस्ता बंद असल्याने व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे रखडलेले रस्त्याचे काम पूर्ण करून रस्ता खुला करावा, अशी मागणी होत आहे.









