चिपळूण
कामथे व पिंपळी या ठिकाणी झालेल्या गोवंश हत्येच्या घटनांचे धागेदोरे थेट आंतरराज्यीय टोळीपर्यंत पोहोचले आहेत. चिपळूण पोलिसांच्या पथकाने मुंबई-मीरा रोड येथून दोघांच्या शनिवारी पहाटे 4 च्या सुमारास मुसक्या आवळल्या. बक्कळ पैसा मिळवण्यासाठी मोकाट जनावरांची कत्तल करून त्याचे मांस मुंबईत विकण्यासाठी घेऊन जात असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रकरणी महंमद शाहीद सुलेमान कुरेशी (39, जगन्नाथ चाळ, जोगेश्वरी पूर्व मुंबई) व शहजाद मकसूद चौधरी (32, शारदा प्लाय ओव्हरब्रीज झोपडपट्टी-दिल्ली) यांना अटक करण्यात आली आहे. तालुक्यातील कामथे येथे 16 जानेवारी व पिंपळी येथे 21 जानेवारी रोजी गोवंश हत्येचा प्रकार घडला होता. या घटनेनंतर मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरु होता. जिल्हय़ासह लगतच्या अन्य जिह्यांतील अशा घटनांतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहितीदेखील घेतली जात होती. सखोल तपासाअंती सीसीटीव्ही फुटेज व गुप्त माहितीनुसार, या घटनेची पाळेमुळे थेट मुंबईपर्यंत पोहोचली असल्याचे स्पष्ट होते. यात कुरेशी व चौधरी यांची नावे प्रकर्षाने पुढे आली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सागर चव्हाण यांच्यासह तपास पथक मुंबईला रवाना झाले. त्यानंतर मुंबई-मीरा रोडवर सापळा रचून कुरेशी व चौधरी यांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात आणखी काहीजणांचा समावेश असून ही आंतरराज्य टोळी आहे. मात्र या घटनेत स्थानिकांचा कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कुरेशी व चौधरी यांनी कामथे व पिंपळी येथील गोवंश हत्येच्या घटनांची कबुली दिली. ही घटना घडण्यापूर्वी ते चिपळुणात आले होते. मोकाट जनावरांना गुंगीचे इंजेक्शन देऊन मोकळय़ा जागेत या गुरांची ते कत्तल करत कत्तलीनंतर जनावरांची आतडी व घाण तेथेच टाकून केवळ मांस सोनेरी रंगाच्या इनोव्हा गाडीतून मुंबईत विक्रीसाठी नेत. गेल्या तीन-चार वर्षापासून ते हा धंदा करत आहेत. कामथे व पिंपळी येथील गोवंश हत्येच्या घटनेत अन्य तिघांचाही समावेश आहे.
गुन्हेगार सराईत
कुरेशी हा गोवंश घटनेतील मुख्य सूत्रधार आहे. त्याचा चौधरी हा सहकारी आहे. ही आंतरराज्यीय टोळी असून गोवंश हत्येमध्ये सराईत आहे. गोवंश हत्येप्रकरणी त्यांच्यावर गुजराथ, दिवदमण, पालघर, पुणे, ठाणे आदी ठिकठिकाणी गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर चव्हाण, हेडकॉन्स्टेबल संदीप नाईक, पोलीस नाईक संतोष शिंदे, गगनेश पटेकर, योगेश नार्वेकर, अजित कदम, आशिष भालेकर, पंकज पडेलकर, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे रमीज शेख, पोलीस मित्र सचिन चोरगे आदींच्या पथकाने केली
दरम्यान, या धडक कारवाईमुळे गोवंश हत्त्येचे जिल्हय़ातील अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. तसेच गतवर्षी लोटे येथे झालेल्या गोवंश हत्येच्या पार्श्वभूमीवर पोलीस चौकशी होणार आहे.









