पतियाळा / वृत्तसंस्था
गोळाफेकपटू तजिंदर पाल सिंग तूरने इंडियन ग्रां प्रि ऍथलेटिक्स स्पर्धेत नवा आशियाई व राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करत टोकियो ऑलिम्पिकसाठी आपला सहभाग निश्चित केला. याच स्पर्धेत राष्ट्रीय महिला 4ƒ100 रिले संघ व धावपटू दुती चंद यांनी देखील नवे विक्रम प्रस्थापित केले. मात्र महिला रिले संघाला ऑलिम्पिक पात्रतेपासून बरेच दूर रहावे लागले.
2018 आशियाई सुवर्णजेता 26 वर्षीय तजिंदर सिंग तूरने 21.49 मीटर्सचा थ्रो करत 21.10 मीटर्स ऑलिम्पिक क्वॉलिफिकेशन मार्क सहज पार केले. आपल्या पहिल्याच प्रयत्नात त्याने स्वतःचाच राष्ट्रीय विक्रमही मोडीत काढला. यापूर्वीचा राष्ट्रीय विक्रम 20.92 मीटर्सचा असून तूरने तो 2019 मध्ये स्थापित केला होता.
तजिंदरने येथे आपल्या दुसऱया, तिसऱया व चौथ्या प्रयत्नात 21.28 मीटर्स, 21.12 मीटर्स, 21.13 मीटर्सची फेक करत आपला फॉर्म दाखवून दिला. पंजाबच्या या ऍथलिटने येथे 12 वर्षांपूर्वीचा आशियाई विक्रम देखील मोडीत काढला. 2009 पासून सौदी अरेबियाच्या सुल्तान अब्दुल्म अल हेबशीचा 21.13 मीटर्सचा विक्रम अबाधित होता.
‘ऑलिम्पिकसाठी मी प्रथमच पात्र ठरलो आणि याचा खास आनंद आहे. हा आशियाई व राष्ट्रीय विक्रम असल्याने यामुळे देखील येथील कामगिरीचे महत्त्व वैशिष्टय़पूर्ण आहे’, असे तजिंदर तूर त्याचा इव्हेंट पूर्ण झाल्यानंतर वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाला. मी 21.20 ते 21.40 मीटर्सची फेक सहज करत होतो. त्यामुळे, ऑलिम्पिक क्वॉलिफिकेशन मार्क पार करु शकतो, असा आत्मविश्वास वाटत होता. टोकियोमध्ये दर्जेदार कामगिरी साकारण्यासाठी मी निश्चितच अनुभव पणाला लावेन’, याचा त्याने येथे उल्लेख केला. ‘मागील वर्षात मला काही दुखापतींचा सामना करावा लागला आणि ज्यावेळी मी तंदुरुस्त झालो, त्यावेळी कोव्हिडची बंधने अंमलात आली. त्या पार्श्वभूमीवर, ही स्पर्धा माझ्यासाठी दिलासा देणारी ठरली. आता 22 मीटर्स फेकीचे माझे लक्ष्य आहे’, असे तजिंदर शेवटी म्हणाला.
महिला रिले संघाला अपयश
या स्पर्धेत हिमा दास, दुती चंद, एस. धनलक्ष्मी व अर्चना सुसिंद्रन यांचा सहभाग असलेल्या महिला रिले संघाला मात्र ऑलिम्पिक क्वॉलिफाईंग ब्रॅकेटपासून दूर रहावे लागले. या संघाने 43.37 सेकंद अशी वेळ नोंदवली. भारत ब संघाने 48.02 सेकंद तर मालदीव संघाने 50.74 सेकंद वेळेत ही रिले पूर्ण केली. भारतीय महिला रिले संघाने 43.05 सेकंद वेळेत रिले पूर्ण केली असती तर त्यांना ऑलिम्पिकसाठी पात्रता संपादन करता येणे शक्य झाले असते. महिलांच्या ऑलिम्पिक रिलेमध्ये यंदाही 16 संघ शर्यतीत असणार आहेत.
महिलांच्या थाळीफेकमध्ये ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या कमलप्रीत कौरने आपलाच राष्ट्रीय विक्रम मागे टाकत 66.59 मी. थाळीफेक करण्याचा नवा विक्रम नोंदवला. मात्र या क्रीडा प्रकारात ती एकच स्पर्धक असल्याने तिचा हा नवा विक्रम नोंदवला जाणार नाही. 65 मीटर्स थाळीफेक करणारी ती भारताची पहिली महिला असून गेल्या मार्चमध्ये येथे झालेल्या फेडरेशन चषक स्पर्धेत तिने 65.06 मीटर्सचा विक्रम केला होता.
उत्तेजक चाचणी निकालावर जर-तरची समीकरणे ठरणार
एनआयएस पतियाळा येथे सुरु असलेल्या या स्पर्धेदरम्यान नाडाचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करणाऱया तसेच सुवर्ण जिंकणाऱया खेळाडूंची उत्तेजक चाचणी होऊ शकते, त्याप्रमाणे तजिंदरकडून चाचणीसाठी नमुने घेतले गेले आहेत. तजिंदर उत्तेजक चाचणीत दोषी नसेल तर त्याच्या या स्पर्धेतील विक्रमावर काहीही परिणाम होणार नाही. मात्र, तो दोषी आढळून आल्यास या विक्रमाची नोंद घेतली जाणार नाही.









